BCCI President: बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत सचिन तेंडुलकर? दिग्गज क्रिकेटपटूकडून निवेदन जारी
BCCI President: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रमुख रॉजर बिन्नी यांनी वयाची 70 वर्षांची मर्यादा पूर्ण केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआयच्या घटनात्मक नियमांनुसार कोणत्याही अधिकाऱ्याला 70 वर्षांनंतर पदावर राहता येत नाही. त्यांच्या राजीनाम्यानंतर महान फलंदाज सचिन तेंडुलकर बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, आता या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
सचिन तेंडुलकरच्या व्यवस्थापनाचे अधिकृत निवेदन
सचिन तेंडुलकर स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने निवेदन जारी करून स्पष्ट केले की, तेंडुलकर यांना बीसीसीआय प्रमुखपदासाठी विचारात घेतल्याच्या किंवा नामांकन झाल्याच्या बातम्या निराधार आहेत. अशा अफवांकडे लक्ष देऊ नये.
बीसीसीआयच्या निवडणुका -
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी होणार असून यामध्ये नवे अध्यक्ष व आयपीएल प्रमुख निवडले जातील. विद्यमान आयपीएल अध्यक्ष अरुण कुमार धुमल यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने ते कूल-ऑफ पीरियडवर जाऊ शकतात. दरम्यान, सचिव देवजीत सैकिया, संयुक्त सचिव रोहन गौंस देसाई आणि कोषाध्यक्ष प्रभतेज सिंग भाटी आपल्या पदांवर कायम राहण्याची शक्यता आहे. उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे देखील बीसीसीआयमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्याची शक्यता आहे.
सचिन तेंडुलकर हा कसोटी व एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 शतके हा अद्वितीय विक्रम आहे. सचिनने कसोटीत 15,921 धावा व एकदिवसीय सामन्यांत 18426 धावा केल्या आहेत.