Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला कर्णधारपद; ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ संघाचे नेतृत्व करणार
Shreyas Iyer: भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. श्रेयस अय्यरला बीसीसीआयने नवी जबाबदारी सोपवली आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीने ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन बहु-दिवसीय सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये अय्यरला कर्णधारपद देण्यात आले आहे. अय्यरची अलीकडेच आशिया कप 2025 साठी मुख्य भारतीय संघात निवड झाली नव्हती.
तथापी, भारत अ संघात एन जगदीसनला विकेटकीपर म्हणून स्थान देण्यात आले असून ध्रुव जुरेलला उपकर्णधार करण्यात आले आहे. जगदीसनने दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाविरुद्ध 197 धावांची भव्य खेळी करून आपली दमदार फॉर्म दाखवली आहे. त्याचबरोबर तरुण फलंदाज देवदत्त पडिकल, आयुष बडोनी आणि नितीश कुमार रेड्डी यांनाही संघात संधी मिळाली आहे. गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, खलील अहमद, मानव सुथार आणि यश ठाकूर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
केएल राहुल आणि मोहम्मद सिराज सामील होणार
महत्त्वाची बाब म्हणजे, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज पहिल्या सामन्यानंतर भारत अ संघात सामील होतील. त्यासाठी दोन खेळाडूंना वगळले जाईल.
मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना: 16-19 सप्टेंबर, लखनौ (सकाळी 9:30) दुसरा सामना: 23-26 सप्टेंबर, लखनौ (सकाळी 9:30)
हेही वाचा - Asia Cup 2025: भारताचा पहिला सामना कधी आणि कोणाविरुद्ध? इथे पाहता येणार आशिया कप लाईव्ह स्ट्रीमिंग
ही मालिका तरुण भारतीय खेळाडूंसाठी कसोटी स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मानली जात आहे. आशिया कपनंतर भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर दोन कसोटी सामने खेळायचे असल्याने या सामन्यांचे महत्त्व आणखी वाढले आहे.