बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात WFI ची मोठी कारवाई; 11 कुस्तीपटू निलंबित
नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघ (WFI) ने बनावट जन्म प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी 11 कुस्तीपटूंवर निलंबनाची कारवाई केली आहे. मागील काही काळापासून कुस्ती स्पर्धांमध्ये वयाशी संबंधित तक्रारी वाढल्याने, महासंघाने संबंधित जन्म प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली महापालिका (MCD) कडून एकूण 110 प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली, ज्यात 11 कुस्तीपटूंचे प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. काही कुस्तीपटूंनी आपले वय कमी दाखवण्यासाठी आणि इतर राज्यातून दिल्लीसाठी खेळण्यासाठी खोटे रहिवासी प्रमाणपत्र तयार केल्याचेही समोर आले आहे.
एमसीडीच्या तपासणीत स्पष्ट झाले की, काही जन्म प्रमाणपत्रांमध्ये फोटोशॉप वापरून छेडछाड करण्यात आली होती. ही प्रमाणपत्रे अधिकृतरीत्या MCD ने जारी केलेली नव्हती. काही प्रकरणांमध्ये जन्माच्या 12 ते 15 वर्षांनंतर ही प्रमाणपत्रे तयार करण्यात आली होती. एमसीडीने जारी केलेल्या बनावट प्रमाणपत्रांमध्ये सक्षम, मनुज, कविता, अंशू, आरुष राणा, शुभम, गौतम, जगरूप धनकड, नकुल, दुष्यंत आणि सिद्धार्थ बालियान यांची नावे आहेत.
हेही वाचा - Hockey Asia Cup : पाकिस्तानी संघाचा भारतात येण्यास नकार; दिले हे धक्कादायक कारण
WFI ने घेतला कठोर निर्णय -
या प्रकारामुळे WFI च्या विश्वसनीयतेवर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे महासंघाने या प्रकारात दोषी आढळलेल्या सर्व कुस्तीपटूंना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. कुस्ती क्षेत्रातील पारदर्शकता आणि नीतिमत्ता जपण्यासाठी महासंघाची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.