Chahal Divorce: 'फसवणूक नाही... मला कंटाळा आला होता; चहलने घटस्फोटानंतर सोडलं मौन
Chahal Divorce: टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल याने वैयक्तिक आयुष्यातील संकटांवर अखेर मौन सोडलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून चहल आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत होत्या. अनेकांनी या प्रकरणावर मत व्यक्त केलं, सोशल मीडियावर विविध चर्चा झडल्या, मात्र स्वत: चहल मात्र शांत होता. आता पहिल्यांदाच चहलने आपल्या भावना उघडपणे मांडल्या असून, तो बोलताना भावूक झाला.
'मी कधीही फसवणूक केली नाही'
चहलने सांगितलं की, घटस्फोटाच्या काळात अनेकांनी त्याच्यावर खोटे आरोप केले. काही लोकांनी त्याला फसवणूक करणारा ठरवलं. या आरोपांमुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता. 'मी कधीही फसवणूक केली नाही. माझ्यापेक्षा विश्वासू माणूस शोधून दाखवा. मी कायम माझ्या जवळच्या लोकांचा विचार केला. मी काही मागितलं नाही, फक्त दिलं,' असं तो म्हणाला.
'प्रत्येक दिवस संघर्षाचा होता'
चहलने सांगितलं की, घटस्फोटाच्या आधी बराच काळ वाद सुरु होते. मात्र दोघांनीही तो वाद लोकांसमोर न आणण्याचा निर्णय घेतला होता. 'आम्ही ठरवलं होतं की शेवटचा निर्णय घेईपर्यंत काहीही बोलायचं नाही. सोशल मीडियावर आम्ही सामान्य जोडप्यासारखेच होतो,' असं त्याने सांगितलं.
'आत्महत्येचे विचार येत होते'
या भावनिक प्रवासात चहल एका टोकाच्या अवस्थेत गेला होता. 'मी इतका तणावाखाली होतो की आत्महत्येचे विचारही मनात येऊ लागले होते,' असं त्याने स्पष्टपणे कबूल केलं. पुढे तो म्हणाला, 'माझ्या आयुष्याला कंटाळा आला होता. रोजचे तेच विचार, तीच चिंता. दोन तास रडणं, थोडं झोपणं आणि पुन्हा तीच अवस्था.'
'क्रिकेटमधून ब्रेक घेतला, कारण संघाला त्रास नको होता'
या मानसिक संघर्षाचा परिणाम त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवरही झाला. चहल म्हणाला, 'माझ्या मानसिक अवस्थेमुळे मी खेळात लक्ष देऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी स्वत:हून 40-45 दिवस क्रिकेटपासून ब्रेक घेतला. मला वाटत होतं की, जर मी खेळलो तर संघाचं नुकसान होईल.'
मानसिक आरोग्याविषयी महत्त्वाचा संदेश
चहलच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा मानसिक आरोग्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. प्रसिद्धीच्या झोतात असलेले खेळाडू देखील खाजगी जीवनातील तणावामुळे खचून जाऊ शकतात. चहलसारख्या खेळाडूने याविषयी खुलेपणाने बोलून इतरांनाही जागरूक केलं आहे की, मानसिक आरोग्याची काळजी घेणं ही काळाची गरज आहे.