India Bans Chinese Apps: सरकारचा पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राइक! Google Play वरून 119 चिनी अॅप्स काढून टाकण्याचे आदेश
India Bans Chinese Apps: सरकारने पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राइक सुरू केला असून गुगल प्ले स्टोअरवरून 119 चिनी अॅप्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. हे अॅप्स चीन आणि हाँगकाँगमधील डेव्हलपर्सशी जोडलेले आहेत. बंदी घातलेल्या बहुतेक अॅप्समध्ये विशेषतः व्हिडिओ आणि व्हॉइस चॅट प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. हे सर्व अॅप्स भारतात गुगल प्ले स्टोअरवर सूचीबद्ध होते. अलिकडच्या एका अहवालानुसार, या अॅप्समुळे भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्व धोक्यात आले होते. भारतीने 2020 मध्ये भारताने पहिल्यांदाच डिजिटल स्ट्राइक केला होता. त्यानंतर टिकटॉक आणि शेअरिटसह शेकडो चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती.
भारताने बंदी घातलेले चिनी अॅप्स अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाद्वारे चालवल्या जाणाऱ्या लुमेन डेटाबेसमध्ये सूचीबद्ध आहेत. 20 जून 2020 रोजी भारताने 100 हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घातली. याशिवाय, 2021 आणि 2022 मध्ये डिजिटल स्ट्राइक करताना भारतात अनेक चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली.
हेही वाचा - तुम्ही सायबर फसवणुकीला बळी ठरले आहात का?...पण तक्रार कोठे कराची माहीत नाहीये का? ही बातमी ठरेल कामाची
दरम्यान, केंद्र सरकारने आयटी कायदा 69 अ अंतर्गत चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. बंदी घातलेल्या काही अॅप्स सिंगापूर, अमेरिका, युके आणि ऑस्ट्रेलियन डेव्हलपर्सचे देखील आहेत. केंद्र सरकारने अॅप्सवरील सार्वजनिक प्रवेश बंद केला आहे. रिपोर्टनुसार, 119 अॅप्सपैकी 15 अॅप्स गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहेत, तर इतर अॅप्स अजूनही प्ले स्टोअरवर आहेत.
'या' अॅप्सवर भारतात बंदी -
बंदी घातलेल्या अॅप्सपैकी फक्त तीन अॅप्सचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यात सिंगापूरस्थित व्हिडिओ चॅट आणि गेमिंग प्लॅटफॉर्म चिलचॅटचा समावेश आहे. हे अॅप मँगोस्टोअर टीमने विकसित केले आहे. गुगल प्ले स्टोअरवर या अॅपचे 10 लाखांहून अधिक डाउनलोड झाले आहेत. याशिवाय, चिनी अॅप चांगअॅपचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्याचे लाखो डाउनलोड आहेत. याशिवाय, ऑस्ट्रेलियन कंपनीने विकसित केलेल्या हनीकॅम अॅपचे नाव देखील या यादीत समाविष्ट आहे.