शुभांशु शुक्लाच्या अंतराळात जाण्याची नवीन तारीख जाहीर; 'या' दिवशी लाँच होणार Axiom-4 मिशन
Axiom-4 Mission: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लाच्या अंतराळ प्रवासाची नवीन तारीख जाहीर झाली आहे. नासाचे मिशन अॅक्सिओम-4 आता उद्या म्हणजेच बुधवारी, 25 जून रोजी प्रक्षेपित होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12:01 वाजता हे अभियान प्रक्षेपित केले जाईल. जर प्रक्षेपण यशस्वी झाले तर ड्रॅगन अंतराळयान गुरुवार, 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राशी जोडले जाईल. अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने प्रक्षेपणाची तारीख सांगितली आहे.
स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान या मोहिमेसाठी फाल्कन-9 रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल, ज्यामध्ये 4 अंतराळवीर 14 दिवसांसाठी अंतराळात जातील. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहून संशोधन करतील. या अंतराळवीरांमध्ये, एक भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा देखील समावेश आहे. जो अंतराळात 41 वर्षांनंतर जाणारा पहिला प्रवासी असेल. शुभांशूच्या आधी, राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये अंतराळात प्रवास केला आहे. शुभांशू शुक्ला हा या मोहिमेचे पायलट असणार आहे.
या मोहिमेचे कमांडर अमेरिकन अंतराळवीर पेगी व्हिटसन आहेत. हंगेरीचे टिबोर कापू आणि पोलंडचे स्लावोज उझनान्स्की हे या मोहिमेचे तज्ज्ञ अंतराळवीर आहेत. या मोहिमेचे प्रक्षेपण आतापर्यंत 6 वेळा पुढे ढकलण्यात आले आहे. हे अभियान प्रथम 29 मे रोजी प्रक्षेपित होणार होते. त्यानंतर 8 जून, 10 जून, 11 जून, 12 जून आणि 22 जून रोजी देखील या मोहिमेचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले.
हेही वाचा - एलोन मस्कच्या SpaceX Starship रॉकेटचा चाचणीदरम्यान स्फोट
अॅक्सिओम-4 मोहिमेवर 14 दिवसांत सुमारे 60 प्रयोग केले जाणार आहेत. भारतीय शास्त्रज्ञांच्या सहकार्याने नासाच्या शास्त्रज्ञांकडून 7 संशोधन केले जाईल. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात अंकुरांची उगवण, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा आणि पिकांच्या बियाण्यांवर किरणोत्सर्गाचा परिणाम, शैवाल यावर देखील संशोधन करण्यात येणार आहे. याशिवाय, इन्सुलिनवर संशोधन केले जाईल. युएईची आरोग्य सेवा प्रदाता कंपनी बुर्जील होल्डिंग्ज सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात ग्लुकोजच्या प्रतिक्रियेवर संशोधन करत आहे.
हेही वाचा - जपानची चंद्र मोहीम अयशस्वी! लँडिंग दरम्यान मून लँडर रेझिलियन्स क्रॅश
दरम्यान, मोहिमेवर जाणारे सर्व अंतराळवीर कक्षीय प्रयोगशाळेत 14 दिवस ग्लुकोज मॉनिटर घालतील. अंतराळवीरांकडे इन्सुलिन पेन देखील असतील, जे वेगवेगळ्या तापमानात ठेवले जातील, जेणेकरून सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा इन्सुलिन रेणूंवर काय परिणाम होतो याचा शोध लावता येणार आहे.