जीव वाचवण्यासाठी पठ्ठ्या भिडला थेट बिबट्याशी; घटनेचा व्हिडीओ समोर
लखीमपूर: उत्तरप्रदेश येथील लखीमपूर खेरी भागात मानव आणि वन्यजीवांमधील संघर्षाच्या घटना सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, बिबट्या आणि माणसांमधील संघर्षाचं चित्रण करणारा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. धौरहरा फॉरेस्ट रेंजमधील बबुरी येथील एका वीट भट्टीत बिबट्या शिरला आणि त्याने तिथल्या एका कामगारावर हल्ला केला. मात्र, बिबट्याने ज्या तरुणावर हल्ला केला होता, त्याने न घाबरता बिबट्याचा सामना केला. या एकटा तरुण बिबट्याशी लढला आणि स्वतःचा बचाव केला. बिबट्याच्या या हल्यात हा तरुण जखमी झाला. मात्र, स्वतःचा जीव वाचवण्यात तो यशस्वी ठरला.
हेही वाचा: ABU AZMI CONTROVERSY: 'अबू आझमी वेडा माणूस'; इम्तियाज जलील यांची आझमींवर टीका तरुणाची बिबट्याशी झुंज:
तरुण आणि बिबट्याची झुंज पाहून वीट भट्टीत काम करणारे इतर मजूर आणि आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले. सर्वजण केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. कोणीही पुढे जाऊन त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. काही तरुण लांब उभे राहून बिबट्याला दगड मारत होते. तर काहीजण विटा फेकून बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्याचा बिबट्यावर फारसा परिणाम झाला नाही. तरुणाने बराच वेळ झुंज दिल्यानंतर बिबट्या तिथून निघून गेला. मात्र, तोपर्यंत हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर वीट भट्टीतील इतर मजुरांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं.