इंडोनेशियात 280 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला भीषण आग, पहा व्हिडिओ
Indonesia Ship Fire: इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी प्रांतातील तालिस बेटाजवळ रविवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. बार्सिलोना व्हीए नावाच्या एका मोठ्या प्रवासी जहाजाला अचानक आग लागली. या जहाजावर सुमारे 280 प्रवासी होते. आग लागल्याचे समजताचं प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि एकच गोंधळ उडाला. घटनेचे हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, प्रवासी लाईफ जॅकेट घालून जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारताना दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार, जहाज मानाडो बंदराकडे जात असताना दुपारी अचानक आगीचा भडका उडाला.
बचाव कार्य सुरू -
उत्तर सुलावेसी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव जेरी हार्मन्सिना यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग अतिशय वेगाने पसरली. नौदल, तटरक्षक दल, राष्ट्रीय बचाव संस्था आणि स्थानिक मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेतली असून सर्व प्रवाशांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा - इराणमध्ये भीषण बस अपघात! 21 जणांचा मृत्यू, 34 जण जखमी
जीवितहानीचे वृत्त नाही -
तथापी, येत्या काही तासांत सर्व प्रवाशांची स्थिती स्पष्ट होईल. सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बचाव कार्यानंतर आगीची चौकशी करण्यात येईल.
हेही वाचा - लॉस एंजेलिसमध्ये भीषण अपघात! अनियंत्रित वाहनाने 20 हून अधिक लोकांना चिरडले
इंडोनेशियात प्रवासी जहाजाला भीषण आग -
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये जहाजातून ज्वाळा आणि काळा धूर निघताना दिसत आहे. प्रवासी किंचाळत समुद्रात उड्या मारत आहेत. तसेच काही प्रवासी घाईघाईने लाईफ जॅकेट घालताना दिसत आहेत.