हल्ला झाला त्या वेळी कुत्र्याचा मालक देखील तिथेच उ

11 वर्षीय मुलावर पिटबुलचा हल्ला; निर्दयी मालक फक्त मजा पाहत राहिला

Pitbull dog attacks on boy

मुंबई: मुंबईच्या पूर्व उपनगरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 11 वर्षीय मुलावर पिटबुल जातीच्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. विशेष म्हणजे, हल्ला झाला त्या वेळी कुत्र्याचा मालक देखील तिथेच उपस्थित होता. परंतु, यावेळी मालक फक्त मुलाची मजा घेत सर्व प्रकार पाहत होता. ही घटना एका ऑटो-रिक्षामध्ये घडली असून, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यावर कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये मुलगा घाबरलेला दिसतो आणि कुत्रा त्याच्या शेजारी बसलेला आहे. कुत्र्याचा मालक रिक्षामध्ये बसलेला असून, तो मुलाची मजा घेताना दिसत आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात मुलाच्या हनुवटीवर गंभीर जखम झाली असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

लोकांमध्ये संताप

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी पिटबुलसारख्या कुत्र्यांवर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. विशेषतः अशा प्राण्यांना सार्वजनिक ठिकाणी घेऊन जाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 

हेही वाचा - पाळीव कुत्रा शेजाऱ्याला चावला; न्यायालयाने मालकाला सुनावली 4 महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा

कुत्र्याच्या मालकाविरोधात तक्रार दाखल -  

पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सोहेल हसन खान याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 125, 125(अ) आणि 291 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. स्थानिक पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केला असून लवकरच कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे. या घटनेनंतर पालकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

हेही वाचा - धक्कादायक! बदलापूरमध्ये भटका कुत्र्याचा 9 वर्षांच्या मुलीवर हल्ला, रेबीजमुळे गमवला जीव

दरम्यान, पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले की, 'मुलगा खेळत होता, तेव्हा आम्हाला कुत्र्याने चावा घेतल्याचे समजले. प्रथम आम्हाला विश्वास बसला नाही. पण व्हिडिओ पाहिल्यावर सर्व स्पष्ट झाले. पोलिस ठाण्यात गेलो, गुन्हा दाखल केला. मात्र नोटीस देऊन आरोपीला लगेच सोडण्यात आले. पीडित मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.