छत्तीसगडमध्ये दुचाकीला बांधून अजगराला क्रूरपणे ओढले; व्हिडिओ पाहून नेटकरी संतप्त
Man Brutally Drags Massive Python: छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एका तरुणाने अजगराला त्याच्या दुचाकीच्या मागे दोरीने बांधून रस्त्यावर ओढत नेले. ही घटना पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून प्राण्यांवरील क्रूरतेबद्दल लोक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
दुचाकीला बांधून अजगराला ओढले -
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अजगराला दुचाकीच्या मागे दोरीने बांधून रस्त्यावर ओढताना दिसत आहे. रस्त्यावरील अनेक वाहनचालकांनी हे दृश्य मोबाईलमध्ये टिपले आणि ते व्हायरल होताच सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. काही नागरिकांनी ही कृती अत्यंत अमानवी आणि अमानुष असल्याचं म्हटलं आहे. तथापी, नेटीझन्सनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा - मुलीने गळ्यात अडकवला साप! आता हसू की रडू कळेना; लोक म्हणाले, भयंकर धाडस!
वन विभागाने घेतली दखल -
घटनेची माहिती मिळताच कांकेर वन विभागाने प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात समोर आले की, ही घटना जंगलाजवळील परिसरात घडली असून आरोपी युवकाने असा दावा केला आहे की तो अजगराला सुरक्षित ठिकाणी नेत होता, जेणेकरून तो गावात कोणालाही इजा करू नये. परंतु, प्राणी संरक्षण कायद्याच्या दृष्टीने ही कृती गंभीर गुन्हा मानली जाते.
हेही वाचा - बाप रे!! एक नाही, दोन नाही…थेट 19 साप दिसले एकत्र; व्हिडिओ पाहून व्हाल अवाक्
यासारखीच एक घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील जहांगीराबाद भागात घडली होती. येथे काही युवकांनी 15 फूट लांबीचा अजगर पकडून जवळपास 3 किमी पर्यंत रस्त्यावर ओढत नेले होते. नंतर अजगराला जंगलात सोडण्यात आले. मात्र, अशा प्रकारची बेजबाबदार वागणूक प्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे.