अजब प्रकार; मद्यपी महिलेने चालवली रेल्वे रुळावर गाडी
हैदराबाद: 'वो स्त्री हैं. कुछ भी कर सकती हैं', ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल. गुरुवारी ही म्हण प्रत्यक्षात घडली. हैदराबाद येथील शंकरपल्ली रेल्वे स्थानकाजवळ एका मद्यपी महिलेने आपली चारचाकी गाडी चक्क रेल्वे रुळावर चालवली. या मद्यपी महिलेने तब्बल आठ किलोमीटर अंतरापर्यंत चारचाकी गाडी चालवली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
नेमकं प्रकरण काय?
तेलंगणातील हैदराबाद येथे एका मद्यपी महिलेने रेल्वे रुळावरून चारचाकी गाडी चालवली. रेल्वे रुळावर चारचाकी गाडी पाहताच रेल्वे अधिकारी हैराण झाले. यादरम्यान, अधिकाऱ्यांनी या मद्यपी महिलेला थांबवण्याचा प्रयत्नही केला, मात्र तिने गाडीचा वेग वाढवला. अशा परिस्थितीत, रेल्वे अधिकाऱ्यांनीही काही अंतरापर्यंत गाडीचा पाठलाग केला. ही बाब रेल्वे स्थानकाला कळवण्यात आली. यानंतर, बेंगळुरू-हैदराबाद मार्गावरील गाड्या थांबवण्यात आल्या. काही अंतर रेल्वे रुळावर गाडी चालवल्यानंतर संबंधित मद्यपी महिलेने चारचाकी गाडी रेल्वे रुळावरून खाली आणली. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
माहितीनुसार, ही महिला मद्यपी अवस्थेत होती, म्हणूनच तिने हे कृत्य केले. अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला असून संबंधित मद्यपी महिला रेल्वे रुळावर कशी पोहोचली याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
या घटनेचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये एक चारचाकी कार रुळांवरून धावताना दिसत आहे. ही घटना शंकरपल्ली रेल्वे स्थानकाजवळ घडली. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'ट्रॅकवर गाडी पाहून सर्व अधिकारी आणि कर्मचारी घाबरले. संपूर्ण कर्मचारी घाबरले होते. खबरदारी म्हणून, बेंगळुरू-हैदराबाद दरम्यानच्या गाड्या थांबवण्यात आल्या. ट्रॅकवरून गाडी हटवल्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली'.