कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या तेलंगणातील 30 वर्षीय य

Crime News : अमेरिकेत तेलंगणातील युवकाचा मृत्यू; कुटुंबीयांची सरकारकडे मदतीची मागणी

कॅलिफोर्निया: कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या तेलंगणातील 30 वर्षीय युवकाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रूममेटसोबत झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात असून, मृत युवकाची ओळख महबूबनगर जिल्ह्यातील मोहम्मद निजामुद्दीन अशी झाली आहे.

निजामुद्दीन 2016 मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. फ्लोरिडा कॉलेजमधून MS पूर्ण केल्यानंतर त्याने सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी सुरू केली आणि बढतीनंतर कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक झाला. त्याचे वडील मोहम्मद हसनुद्दीन यांनी सांगितले की, 3 सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून नेमकं काय झालं याबद्दल अजूनही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

हेही वाचा: Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने वादाचे मोहोळ, नेमकं काय म्हणाले?

हसनुद्दीन यांनी परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांना पत्र लिहून आपल्या मुलाचे पार्थिव भारतात आणण्यासाठी मदतीची विनंती केली आहे. “आज सकाळी समजले की माझ्या मुलाला पोलिसांनी गोळी मारली असून त्याचा मृतदेह सांताक्लारामधील रुग्णालयात आहे. यामागील कारण अजून समजलेले नाही,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मृताच्या एका नातेवाइकाने सांगितले की, रूममेटसोबत AC वरून झालेला किरकोळ वाद चाकूंच्या वापरापर्यंत गेला. शेजाऱ्याने पोलिसांना कळवल्यानंतर ते घटनास्थळी आले. “पोलिसांनी हात वर करण्यास सांगितले, मात्र एकाने आदेश न पाळल्याने गोळीबार करण्यात आला,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, योग्य चौकशी न करता घाईघाईत कारवाई करण्यात आली.

कुटुंबीयांनी केंद्र आणि तेलंगणा सरकारला मृतदेह भारतात आणण्यासाठी तातडीने मदतीची विनंती केली आहे. मजलिस बचाओ तह्रीकचे प्रवक्ते अमजद उल्ला खान यांनीही या घटनेबाबत ट्विट करत परराष्ट्र मंत्रालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.