युक्रेनच्या राजकारणात ऐतिहासिक वळण! युलिया स्वीरिडेन्को बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
कीव: रशियासोबत सुरू असलेल्या भयंकर युद्धादरम्यान युक्रेनने आपला नवीन पंतप्रधान निवडला आहे. युलिया स्वीरिडेन्को यांची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी निवड झाली आहे. बुधवारी युक्रेनच्या संसदेत झालेल्या मतदानात 262 खासदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केले, तर केवळ 22 खासदारांनी विरोध केला. स्वीरिडेन्को यांच्याकडे अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून काम करण्याचा मोठा अनुभव आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला होता.
युलिया यांची बहुमताने युक्रेनच्या पंतप्रधानपदी निवड -
युलिया यांची बहुमताने युक्रेनच्या नवीन पंतप्रधानपदी निवड झाली. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर, स्वीरिडेन्को यांनी आपल्या भाषणात युद्धकाळातील अर्थव्यवस्था स्थिर करणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे आणि युरोपीय युनियन व नाटो सदस्यत्वासाठी आवश्यक सुधारणा जलद गतीने राबवण्यावर भर दिला. या निवडीमुळे युद्धग्रस्त युक्रेनमध्ये नेतृत्वाच्या पातळीवर एक नवे आणि प्रेरणादायी पर्व सुरू झाले आहे.
हेही वाचा - इराकच्या शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग; 50 जणांचा मृत्यू, पहा व्हिडिओ
राष्ट्रपती झेलेन्स्की यांचा पाठिंबा -
दरम्यान, स्वीरिडेन्को यांच्या उमेदवारीला राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचा पूर्ण पाठिंबा होता. मतदानापूर्वी राष्ट्रपती कार्यालयाने एक निवेदन जारी केले होते. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, स्वीरिडेन्को यांच्याकडे आवश्यक प्रशासकीय अनुभव आणि संकट व्यवस्थापन क्षमता आहेत, ज्यामुळे या कठीण काळात देश पुढे जाऊ शकतो.
हेही वाचा - इस्रायलचा सीरियावर हल्ला; जीव वाचवण्यासाठी टीव्ही अँकरने स्टुडिओतून काढला पळ
कोण आहेत युलिया स्वीरिडेन्को?
स्वीरिडेन्को यांनी आपली कारकीर्द स्थानिक प्रशासनात आर्थिक धोरणे आणि विकास विषयांवर काम करून सुरू केली. त्यांना युक्रेनमधील आर्थिक सुधारणांचा अभ्यास आणि अंमलबजावणीचा अनुभव आहे. त्यांनी चेर्निहिव प्रांतात उपगव्हर्नर आणि नंतर गव्हर्नर म्हणून काम केले आहे. 2019 मध्ये, स्वीरिडेन्को यांना आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री म्हणून नेमण्यात आले होते. त्यांनी पहिल्या उपपंतप्रधान व अर्थमंत्री म्हणून झेलेन्स्की सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. युलिया स्वीरिडेन्को यांचे नेतृत्व युक्रेनसाठी एका नवीन पर्वाची सुरुवात मानली जात आहे.