ब्राझीलनंतर पंतप्रधान मोदी नामिबियाला पोहोचले, पहा खास फोटोज
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या बहुप्रतिक्षित नामिबिया दौऱ्यावर पोहोचले आहेत. भारत आणि नामिबियामधील धोरणात्मक भागीदारीला नवीन उंची देण्याच्या दिशेने हा दौरा एक ऐतिहासिक पाऊल मानला जात आहे. तीन दशकांत भारतीय पंतप्रधानांचा नामिबियाचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे. नामिबियामध्ये पारंपारिक पद्धतीने पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी नामिबियाच्या स्थानिक कलाकारांसह ढोल वाजवला.
दोन्ही देशात होऊ शकतात सामंजस्य करार
पंतप्रधान मोदी आणि नामिबियाचे अध्यक्ष नेतुम्बो नंदी-नदाटवाह यांच्या सोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत व्यापार, संरक्षण, डिजिटल सहकार्य आणि जागतिक दक्षिणेतील भागीदारी यासारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा समाविष्ट आहे. भारत आणि नामिबियामध्ये व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य, आयसीटी आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रात एकूण सहा महत्त्वाचे सामंजस्य करार (एमओयू) केले जाऊ शकतात.
दोन्ही देशातील सामंजस्य करारात यूपीआयसह खनिज आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावरील करारांचाही समावेश असेल. भारत आणि नामिबिया हिऱ्यांच्या थेट आयातीसाठी वाटाघाटी करत आहेत, ज्यामुळे मध्यस्थांची भूमिका कमी होईल. तसेच, युरेनियम, कोबाल्ट आणि लॅन्थानाइड्स सारख्या महत्त्वाच्या खनिजांवर दीर्घकालीन करार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा - गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! वडोदरा-आनंदला जोडणारा पूल कोसळला; 9 जणांचा मृत्यू
दरम्यान, नामिबियाला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'काही काळापूर्वी विंडहोकला पोहोचलो. नामिबिया हा एक मौल्यवान आणि विश्वासार्ह आफ्रिकन भागीदार आहे, ज्यांच्यासोबत आपण द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करू इच्छितो. मी राष्ट्रपती डॉ. नेतुम्बो नंदी-नदाटवाह यांना भेटण्यास आणि आज नामिबियाच्या संसदेला संबोधित करण्यास उत्सुक आहे.'
हेही वाचा - 9 जुलै रोजी भारत बंद असल्यामुळे कोणकोणत्या सेवांवर परिणाम होणार?
पंतप्रधान मोदी नामिबियाच्या संसदेला संबोधित करणार
तथापी, पंतप्रधान मोदी त्यांच्या भेटीदरम्यान नामिबियाच्या संसदेला संबोधित करणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या बाहेरील आफ्रिकन देशाच्या संसदेत भारतीय पंतप्रधान भाषण देण्याची ही पहिलीच वेळ आहे.