भारतानंतर आता 'या' देशात दहशतवादी हल्ला! 2 बॉम्बस्फोटात किमान 26 जणांचा मृत्यू
अबुजा: भारतासह जगभरातील अनेक देश सतत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत आहेत. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या संख्येने निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी आफ्रिकन देश नायजेरियामध्येही एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी दोन बॉम्बस्फोट केले. या बॉम्बस्फोटात दोन डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
बॉम्बस्फोटात 26 जणांचा मृत्यू -
बॉम्बस्फोटाच्या स्वरूपात हा भयानक दहशतवादी हल्ला सोमवारी नायजेरियातील ईशान्य बोर्नो राज्यात झाला. तपासात असे दिसून आले की, दहशतवाद्यांनी दोन वाहनांमध्ये स्फोट घडवून आणले. परदेशी नागरिकांना सुरक्षा प्रदान करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा संघटनेने माहिती दिली आहे की, या स्फोटांमध्ये किमान 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बोर्नो राज्य हे इस्लामिक अतिरेक्यांचा बालेकिल्ला आहे.
हेही वाचा - युरोपीय देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालसह अनेक देशात मेट्रो आणि विमान सेवा बंद
नायजेरियात दहशतवादी हल्ला -
गेल्या काही काळापासून नायजेरियात असे हल्ले सातत्याने वाढत आहेत. दोनच दिवसांपूर्वी, नायजेरियातील झामफारा राज्यातील एका गावात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात किमान 20 जणांचा मृत्यू झाला आणि डझनभर जण जखमी झाले. बंदूकधाऱ्यांनी प्रथम सोन्याच्या खाणीला लक्ष्य केले आणि त्यात 14 लोक ठार झाले. त्यानंतर त्यांनी घरांमध्ये आणि मशिदीत लोकांवर हल्ला केला.
हेही वाचा - भारताने चूक केली तर आम्ही प्रत्युत्तर देऊ; पाकिस्तानी मंत्र्यांचे मोठे विधान
याशिवाय, सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, उत्तर-मध्य नायजेरियातील एका ख्रिश्चन शेतकरी समुदायावर मुस्लिम बंदूकधार्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात किमान 40 जणांचा मृत्यू झाला होता. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या मते, बंदूकधार्यांनी अचानक हल्ला केला, ज्यामुळे लोक पळून जाऊ शकले नाहीत.