बदल्याला सुरुवात? पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट! बलुचिस्तानमधील क्वेटामध्ये 4 जणांचा मृत्यू
बलुचिस्तान: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक भारतीयांकडून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. अशातचं आता बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथून एक धक्कादायक बातमी येत आहे. क्वेट्टा येथे 25 एप्रिल 2025 रोजी झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट मार्गेट चौकी किंवा डबल रोडजवळ झाला, जिथे सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सुरुवातीच्या अहवालांनुसार, हा एक आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस) स्फोट होता, जो खूप तीव्रतेचा होता आणि त्याचा आवाज दूरवर ऐकू आला.
हेही वाचा - 'पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि परत पाठवा'; अमित शाहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश
अनेक वापरकर्त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेबद्दल पोस्ट केली असून स्फोटोसंदर्भात पुष्टी केली आहे. तथापि, अद्याप कोणत्याही अधिकृत सूत्राने या घटनेची पुष्टी केलेली नाही. या स्फोटामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास; दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आले भारतात
दरम्यान, सध्या कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. पाकिस्तानी लष्कराने परिसराला घेराव घातला असून याठिकाणी शोध मोहीम राबवण्यात येते आहे.