सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या निर्णयाम

Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये सत्तापालटाचे संकट! 3 मंत्र्यांच्या राजीनाम्यांनंतर पंतप्रधान ओली अडचणीत

Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये राजकीय संकट अधिकच गडद होत चालले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे राजधानी काठमांडूमध्ये सुरू झालेल्या जनरल-झेड निदर्शनांनी हिंसक रूप धारण केले. या आंदोलनात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, ज्यामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओलींच्या नेतृत्वावरील प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहे.

मंत्र्यांच्या राजीनाम्यांची मालिका

प्राप्त माहितीनुसार, पंतप्रधान ओली उपचाराच्या निमित्ताने दुबईला जाण्याची तयारी करत आहेत. यासाठी खाजगी विमान कंपनी हिमालय एअरलाइन्स ला स्टँडबायवर ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. राजीनाम्यांच्या मालिकेत सोमवारी देशाचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला. त्यानंतर मंगळवारी कृषी मंत्री रामनाथ अधिकारी आणि आरोग्य मंत्री प्रदीप पौडेल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. या घडामोडींमुळे ओली सरकार आणखी अस्थिर झाले आहे.

हेही वाचा - Nepal Gen- Z Protest: नेपाळमधील हिंसाचारानंतर भारताने उचलले कठोर पाऊल; 'सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये...

आंदोलन का भडकले?

दरम्यान, 4 सप्टेंबर रोजी ओली सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, एक्स यांसह एकूण 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. याचा निषेध करण्यासाठी 8 सप्टेंबर रोजी काठमांडूमध्ये हजारो तरुण रस्त्यावर उतरले. सुरुवातीला शांततेत झालेला हा विरोध हळूहळू हिंसक बनला. पोलिसांशी झालेल्या संघर्षात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली.

हेही वाचा - Nepal Gen- Z Protest : नेपाळमध्ये युवांचा संताप; सोशल मीडिया कायद्यामागचे रहस्य काय?

सरकारचा निर्णय मागे

वाढत्या विरोधामुळे ओली सरकारने शेवटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदीचा निर्णय मागे घेतला. मात्र, या आंदोलनाने राजकीय वादळ अधिक तीव्र केले आहे. मंत्र्यांच्या राजीनाम्यांमुळे सरकारवरील विश्वास उरला नाही, अशी चर्चा नेपाळच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. नेपाळमध्ये सुरू असलेले हे संकट केवळ सरकारपुरते मर्यादित न राहता देशाच्या लोकशाही व्यवस्थेसाठी मोठे आव्हान ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत नेपाळमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.