अमेरिकेतील अलास्का राज्यात भूकंपाचे धक्के; त्सुनामीचा इशारा जारी
Earthquake in Alaska: अलास्का द्वीपकल्पाच्या मध्यभागी असलेल्या पोपोफ बेटावरील सँड पॉइंटजवळ आज सकाळी 7.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप झाला. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:07 वाजता आणि अलास्काच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रात सुमारे 36 किलोमीटर खोलवर असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) आणि यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने दिली आहे.
अलास्का परिसरात त्सुनामीचा इशारा -
भूकंपामुळे अलास्का परिसरात त्सुनामीचा धोका निर्माण झाला असून किनारी भागातील लोकांसाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोडियाक, सँड पॉइंट आणि उनालास्का या भागांमध्ये नागरिकांना समुद्रसपाटीपासून दूर राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सँड पॉइंट आणि परिसरात भूकंपाचा फटका
या भूकंपाचा मोठा परिणाम सँड पॉइंट या दुर्गम गावावर झाला आहे. सुमारे 580 लोकसंख्या असलेल्या या गावात आणि जवळच्या मासेमारीवर अवलंबून असलेल्या उनालास्का शहरात मोठ्या प्रमाणात भूकंपाचे हादरे जाणवले. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून किमान 50 फूट उंचीवर सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा - Delhi NCR Earthquake: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; ''इतकी'' होती तीव्रता
भूकंप विनाशकारी ठरण्याची शक्यता
मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, 7 ते 8 रिश्टर तीव्रतेचे भूकंप अत्यंत विनाशकारी ठरू शकतात. विशेषतः उथळ खोलीवर असलेल्या भूकंपाचे परिणाम अधिक तीव्र असतात. यामुळे रस्त्यांना भेगा पडणे, इमारतींचे नुकसान आणि संभाव्य भूस्खलन यांचा धोका वाढतो. USGS च्या माहितीनुसार, हा भूकंप पॅसिफिक आणि उत्तर अमेरिका टेक्टॉनिक प्लेट्समधील सबडक्शन झोनमध्ये थ्रस्ट फॉल्टिंगमुळे झाला आहे. अलास्का-अलेयुशियन सबडक्शन सिस्टम ही संपूर्ण अमेरिका खंडातील सर्वाधिक सक्रिय भूकंपीय क्षेत्रांपैकी एक आहे. याच भागात 130 हून अधिक ज्वालामुखी असून तीन-चतुर्थांश अमेरिकन ज्वालामुखी याच भागात आहेत.
हेही वाचा - एका गूढ भाकीतामुळे जपानमध्ये घबराट! 21 जूनपासून 700 हून अधिक भूकंप झाल्याने लोकांमध्ये विनाशाची भीती
सतर्कतेचा इशारा -
दरम्यान, भूकंपानंतर काही वेळातच त्सुनामी इशारा जारी करण्यात आला आहे. तसेच हवामान आणि आपत्कालीन यंत्रणांनी संभाव्य धोक्याचा अंदाज घेत नागरिकांना सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. तांत्रिक पथकांनी या घटनेवर लक्ष केंद्रित केले असून आपत्ती व्यवस्थापन उपाय सुरू करण्यात आले आहेत. भविष्यातील धोक्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि भूकंपतज्ज्ञ परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.