US Helicopter Crash: अमेरिकेत हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळले; 6 जणांचा मृत्यू, पहा व्हिडिओ
US Helicopter Crash: अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात गुरुवारी न्यू यॉर्कमधील हडसन नदीत घडला. या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात लोअर मॅनहॅटन आणि जर्सी सिटी दरम्यान झाला. अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले.
एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू -
न्यू यॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी सांगितले की, मृतांमध्ये पायलट आणि पाच जणांचे स्पॅनिश कुटुंब समाविष्ट आहे. न्यू यॉर्क पोलिस विभागाने या घटनेची माहिती शेअर करताना म्हटले आहे की, वेस्ट साइड हायवे आणि स्प्रिंग स्ट्रीटजवळ हडसन नदीत एक हेलिकॉप्टर कोसळले आहे.
अमेरिकेत नदीत कोसळले हेलिकॉप्टर -
तथापी, सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर पूर्णपणे पाण्यात बुडालेले दिसत आहे. अपघात झाला तेव्हा आकाश ढगाळ होते, सुमारे 10 ते 15 मैल प्रतितास वेगाने वारे वाहत होते. तसेच हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने सांगितले की, ते राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (एनटीएसबी) सोबत काम करत आहे.
हेही वाचा - China Nursing Home Fire: चीनमधील नर्सिंग होममध्ये भीषण आग! 20 जणांचा होरपळून मृत्यू
घटनास्थळी असलेले प्रत्यक्षदर्शी ब्रूस वॉल यांनी सांगितले की, त्यांनी हेलिकॉप्टर हवेतून नदीत कोसळताना पाहिले. हेलिकॉप्टर कोसळले तेव्हा प्रोपेलर फिरत होता. हेलिकॉप्टर नदीत कोसळले तेव्हा मोठा आवाज ऐकू आला. मी खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा हेलिकॉप्टर अनेक तुकडे होऊन नदीत पडले. हेलिकॉप्टर पाण्यात कोसळण्यापूर्वी अनियंत्रितपणे फिरत होते. त्यानंतर ते नदीत कोसळले.