ब्रिटनमध्ये ऐतिहासिक निर्णय! आता 16 आणि 17 वर्षांची मुलेही बजावू शकतात मतदानाचा अधिकार
लंडन: केयर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालील नव्या यूके सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेत देशातील लोकशाही प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणला आहे. आता ब्रिटनमधील 16 आणि 17 वर्षे वयोगटातील तरुणांना सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दशकानंतर प्रथमच ब्रिटनमध्ये मतदानाच्या वयोमर्यादेत बदल करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये मतदानाच्या वयात शेवटचा बदल 1969 मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले होते. आता 2025 मध्ये, पंतप्रधान केयर स्टार्मर यांच्या सरकारने लोकशाही सहभाग वाढवण्यासाठी मतदानाची वयोमर्यादा 16 वर्षांपर्यंत खाली आणली आहे. संसदेच्या मंजुरीनंतर हा कायदा अधिकृतपणे लागू होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान केयर स्टार्मर यांच्या सरकारने सांगितले की संसदेच्या मंजुरीनंतर हा बदल लागू केला जाईल. सरकारचे म्हणणे आहे की यामुळे 16-17 वर्षे वयोगटातील तरुणांना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळेल. या वयातील अनेक तरुण आधीच सैन्यात सेवा देत आहेत. 16-17 वयोगटातील अनेक तरुण सध्या कर भरतात, सैन्यात सेवा करतात आणि समाजातील जबाबदाऱ्या पार पाडतात, त्यामुळे त्यांना मत देण्याचा हक्क दिला गेला पाहिजे.
तथापी, उपपंतप्रधान अँजेला रेनर यांनी म्हटलं आहे की, 'आपल्या लोकशाहीत लोकांचा सहभाग वाढावा म्हणून आम्ही अडथळे दूर करत आहोत. 16 वर्षांच्या तरुणांना मतदानाचा हक्क देणे हे आमच्या निवडणूक जाहीरनाम्यातील वचन होते आणि ते आम्ही पूर्ण करत आहोत.'
हेही वाचा - देशातील IIT, IIM, AIIMS आणि NID संस्थांचा UGC च्या डिफॉल्टर यादीत समावेश; काय आहे यामागचं कारण?
मतदार ओळखपत्रांमध्ये बदल
नवीन कायद्यानुसार, मतदार ओळखपत्रासाठी अधिक सुलभता देण्यात आली असून बँक कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि व्हेटरन कार्ड यासारखी डिजिटल कागदपत्रे देखील ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे मतदान प्रक्रिया आणखी सर्वसमावेशक होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
हेही वाचा - बिहार ठरले देशातील पहिले ई-व्होटिंग राज्य! नागरिकांनी घरातून मोबाईद्वारे केलं मतदान
ब्रिटन आता अशा काही देशांमध्ये सामील झाला आहे जेथे किशोरवयीन मतदारांना मतदानाचा हक्क आहे. यात ब्राझील, अर्जेंटिना, ऑस्ट्रिया, इक्वेडोर, ग्रीस, उत्तर कोरिया यांचा समावेश आहे, जिथे मतदानाचे वय 16 किंवा 17 आहे. ब्रिटनमधील हे नवीन नियम अधिक मतदार नोंदणीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. ब्रिटन सरकारचा हा बदल लोकशाहीमध्ये तरुणांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.