गरम हवेच्या फुग्याला लागली आग! 8 जणांचा मृत्यू; भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
Brazil Air Balloon Crash: ब्राझीलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सांता कॅटरिना या दक्षिणेकडील भागात हॉट एअर बलून कोसळून झालेल्या अपघातात किमान 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती देताना राज्याचे गव्हर्नर जॉर्जिन्हो मेलो म्हणाले की, प्राथमिक अहवालानुसार, बलूनमध्ये 22 जण होते. आतापर्यंत 2 जणांना जिवंत वाचवण्यात आले आहे, तर उर्वरित बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. त्यांनी सांगितले की, परिसरात बचाव कर्मचारी मदतकार्य करत आहेत. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये बलून हजारो फूट उंचीवरून कोसळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एअर बलून खूप वेगाने खाली पडू लागतो. हा व्हिडिओ @disclosetv या हँडलवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा - लाईव्ह टेलीकास्ट सुरू असताना इस्रायलचा इराणी ब्रॉडकास्ट इमारतीवर हल्ला; टीव्ही अँकरने काढला स्टुडिओमधून पळ
ब्राझीलमध्ये एअर बलूनला आग -
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये हवेत उडणाऱ्या एका बलूनला अचानक आग लागल्याचे दिसून येते, ज्यामुळे तो वेगाने खाली पडतो. आग लागल्यानंतर, फुग्याची रचना कोसळते आणि तो जमिनीवर आदळतो. राज्यपाल मेलो यांनी म्हटलं आहे की, 'या अपघाताने सर्वांना धक्का बसला आहे. ही एक अतिशय दुःखद आणि अनपेक्षित दुर्घटना आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. लवकरच सविस्तर माहिती शेअर केली जाईल.