India Pakistan Conflict: 'मला नोबेल पारितोषिक मिळायला हवे...'; डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत-पाकिस्तानसह 7 युद्धे थांबवल्याचा दावा
India Pakistan Conflict: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत नोबेल पारितोषिकाची मागणी केली आहे. त्यांनी दावा केला की भारत-पाकिस्तान संघर्षासह जगातील सात मोठी युद्धे त्यांनी थांबवली आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्येक युद्धासाठी नोबेल पारितोषिक मिळायला हवे. ट्रम्प अमेरिकन कॉर्नरस्टोन इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, 'मला सांगण्यात आले की जर मी रशिया-युक्रेन युद्ध थांबवले, तर मला नोबेल पारितोषिक मिळेल. पण मग मी विचारले मी थांबवलेल्या सात युद्धांचे काय? त्यासाठी मला सात पारितोषिके मिळायला हवीत.'
भारत-पाकिस्तान संघर्षाचाही दावा
ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवले. मी दोन्ही देशांना स्पष्ट सांगितले की जर ते लढले तर व्यापार होणार नाही. त्यांच्याकडे अण्वस्त्रेही आहेत. माझे ऐकून त्यांनी युद्ध थांबवले, असा दावाही ट्रम्प यांनी केला. याशिवाय त्यांनी थायलंड-कंबोडिया, आर्मेनिया-अझरबैजान, कोसोवो-सर्बिया, इस्रायल-इराण, इजिप्त-इथिओपिया आणि रवांडा-काँगो यांच्यातील संघर्ष संपवण्याचे श्रेयही स्वतःला दिले.
हेही वाचा - H-1B Visa: ट्रम्प यांचा कडक आदेश! H-1B साठी तब्बल 88 लाख रुपये फी, मात्र 'यांना' मिळणार दिलासा; जाणून घ्या
भारताने फेटाळला दावा
यापूर्वीही ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचा दावा केला होता. मात्र भारत सरकारने नेहमीच त्यांचा हा दावा फेटाळला असून, भारत-पाकिस्तान संबंध हे केवळ द्विपक्षीय स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुतिनवरही नाराजी
रशिया-युक्रेन युद्धाबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले, 'हे युद्ध थांबवणे सर्वात सोपे असेल असे मला वाटले होते, पण तसे झाले नाही. पुतिनसोबत माझी चर्चा चांगली झाली, तरी मी त्यांच्यावर नाराज आहे.' ट्रम्प यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे.