भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सुरक्षा निर्द

भारत व पाकिस्तान अमेरिकेपेक्षाही सुरक्षित! जाणून घ्या जगातील असुरक्षित देशांची यादी

अमेरिका, जी जागतिक महासत्ता मानली जाते आणि शिक्षण व उद्योगांसाठी जगभरातील लोकांचे आकर्षण आहे, ती सुरक्षिततेच्या यादीत 89 व्या स्थानी आहे. हा क्रमांक पाहून अनेकांना धक्का बसू शकतो. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सुरक्षा निर्देशांकानुसार अमेरिकेपेक्षा चांगली स्थिती मिळवली आहे. पाकिस्तान 65 व्या तर भारत 66 व्या क्रमांकावर आहे.

जगातील सर्वात सुरक्षित देश कोणता? अँडोरा, जो दक्षिण युरोपातील एक छोटा देश आहे, 2025च्या नुम्बेओ सेफ्टी इंडेक्सनुसार जगातील सर्वात सुरक्षित राष्ट्र म्हणून समोर आला आहे. प्रवासादरम्यान व्यक्तिगत सुरक्षेला महत्त्व देणाऱ्या लोकांसाठी हा देश सर्वाधिक सुरक्षित मानला जातो. फ्रान्स आणि स्पेन या दोन देशांच्या मध्ये असलेला हा भूपरिवेष्टित प्रदेश आहे.

नुम्बेओने 2025 मध्ये राष्ट्रनिहाय सुरक्षा निर्देशांक प्रकाशित केला असून, यात 146 देशांचा समावेश आहे. या सर्वेक्षणासाठी त्यांच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या लोकांचे मत विचारात घेण्यात आले.

हेही वाचा: झाडांची तोड मानवी हत्येपेक्षा गंभीर, प्रति झाड एक लाख रुपये दंड

या क्रमवारीसाठी खालील महत्त्वाचे निकष विचारात घेण्यात आले:     •    दिवस आणि रात्री फिरताना नागरिकांना वाटणारी सुरक्षा     •    गुन्हेगारीचा स्तर     •    लूटमार, दरोडे, वाहन चोरी     •    अनोळखी व्यक्तींकडून होणारे हल्ले     •    सार्वजनिक ठिकाणी होणारा छळ     •    त्वचेच्या रंगावर, वंशावर किंवा धर्मावर आधारित भेदभाव     •    लिंगभेद आणि त्यामुळे उद्भवणारे गुन्हे

याच सर्वेक्षणाच्या आधारावर सुरक्षित आणि असुरक्षित देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जगातील सर्वात सुरक्षित 10 देश

1. अँडोरा 2. युनायटेड अरब अमिराती 3. कतार 4. तैवान 5. ओमान 6. आइल ऑफ मॅन 7. हॉन्गकॉन्ग 8. आर्मेनिया 9. सिंगापूर 10. जपान

जगातील सर्वात असुरक्षित 10 देश

1. व्हेनेझुएला 2. पपुआ न्यू गिनी 3. हायती 4. अफगाणिस्तान 5. दक्षिण आफ्रिका 6. होंडुरस 7. त्रिनिदाद आणि टोबॅगो 8. सिरिया 9. जमैका 10. पेरू

ही यादी पाहता जगभरातील विविध देशांमधील सुरक्षा आणि असुरक्षा यामध्ये मोठा फरक दिसून येतो.