PM Modi China Visit: भारत-चीन मैत्री गरजेची; मोदींच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांचे वक्तव्य
PM Modi China Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) तियानजिन शिखर परिषदेदरम्यान महत्वाची द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत जिनपिंग यांनी सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत-चीन मैत्री आणि सहकार्य अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. जिनपिंग म्हणाले, 'पंतप्रधान मोदींना भेटून मला खूप आनंद झाला आहे. आजचे जग शतकातून एकदाच होणाऱ्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती अस्थिर आणि गुंतागुंतीची आहे. अशा काळात भारत आणि चीनने चांगले शेजारी व मित्र बनणे गरजेचे आहे.' त्यांनी यावेळी हे वर्ष चीन-भारत राजनैतिक संबंधांचा 75 वा वर्धापन दिन असल्याची आठवण करून दिली.
जिनपिंग म्हणाले की, दोन्ही देशांनी त्यांचे संबंध धोरणात्मक दृष्टिकोनातून आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिले पाहिजेत आणि हाताळले पाहिजेत. बहुध्रुवीय जगात आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बहुपक्षीयता टिकवून ठेवण्यासाठी आणि अधिक लोकशाही आणण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल. त्याच वेळी, आपल्याला आशिया आणि संपूर्ण जगात शांतता आणि समृद्धीसाठी आपले खरे योगदान द्यावे लागेल.
गेल्या वर्षी कझानमध्ये आमची बैठक यशस्वी झाली आणि चीन-भारत संबंधांना एक नवीन सुरुवात झाली. दोन्ही बाजूंनी आम्ही ज्या महत्त्वाच्या सहमतीवर सहमत झालो होतो त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे, असंही जिनपिंग यांनी म्हटल आहे. चीन आणि भारत पूर्वेकडील दोन प्राचीन संस्कृती आहेत. आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले दोन देश आहोत आणि जागतिक दक्षिणेचे महत्त्वाचे सदस्य देखील आहोत. आपल्या दोन्ही देशांवर आपल्या नागरिकांचे कल्याण वाढवणे, विकसनशील देशांची एकता आणि पुनरुज्जीवन वाढवणे आणि मानवी समाजाची प्रगती पुढे नेणे ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. दोन्ही देशांनी चांगले शेजारी आणि मित्र बनणे, एकमेकांच्या यशात भागीदार बनणे आणि 'ड्रॅगन आणि हत्ती' यांना एकत्र पुढे जाऊ देणे हा योग्य निर्णय आहे, असंही जिनपिंग यांनी यावेळी स्पष्ट केलं.
ट्रम्पवर अप्रत्यक्ष टीका
पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेत जिनपिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी धोरणांवर निशाणा साधला. त्यांनी बहुपक्षीयतेचे समर्थन केले आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी भारत-चीन एकत्र काम करणार असल्याचे सांगितले. गेल्या 10 महिन्यांतील ही मोदी-जिनपिंग यांची पहिली भेट होती. व्यापारी संबंध, शुल्क धोरणे आणि बदलत्या जागतिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जात आहे.