Israel killed Journalist in Hamas : इस्रायलचा पत्रकारांवरच हल्ला ! 4 पत्रकारांचा घेतला जीव, अल-जझीराचा आरोप
इस्राइल आणि हमास यांच्यातील युध्द काही थांबायचे नाव घेत नाही. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हमासच्या सैनिक आणि सामान्य लोकांनंतर आता मीडिया कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य केले जात आहे. गाझा शहरात इस्रायली हल्ल्यात अल-जझीराचे पत्रकार अनस अल-शरीफ यांच्यासह इतर चार पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.
अल-शिफा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पत्रकारांसाठी उभारलेल्या तंबूवर रविवारी रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अल-जझीराचे प्रतिनिधी मोहम्मद कुरेकेह आणि कॅमेरामन इब्राहिम झहर, मोहम्मद नौफल आणि मोआमेन अलिवा यांच्यासह एकूण सात जणांचा मृत्यू झाला. 28 वर्षीय अल-शरीफ, जे उत्तर गाझा येथून नियमितपणे रिपोर्टिंग करत होते, त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की इस्रायलने गाझा शहराच्या पूर्व आणि दक्षिण भागात तीव्र बॉम्बहल्ला सुरू केला आहे.
अल-जझीरा मीडिया नेटवर्कने या हत्येचा निषेध केला आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर हा आणखी एक पद्धतशीर हल्ला असल्याचे म्हटले. नेटवर्कने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'अनस अल-शरीफ आणि त्यांच्या साथीदारांची हत्या ही गाझावरील ताब्याचे सत्य उघड करणाऱ्या आवाजांना दाबण्याचा एक हताश प्रयत्न आहे.'
200 हून अधिक पत्रकार आणि मीडिया कर्मचारी मारले गेले
संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधी आयरीन खान यांनीही यापूर्वी इशारा दिला होता की गाझामधील पत्रकारांना निराधार आरोपांच्या आधारे लक्ष्य केले जात आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये गाझावर इस्रायली हल्ल्यांना सुरुवात झाल्यापासून, 200 हून अधिक पत्रकार आणि मीडिया कर्मचारी मारले गेले आहेत, ज्यात अनेक अल-जझीराचे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.