एस्टोनियाच्या हवाई हद्दीत शुक्रवारी तीन रशियन मिग-

Russian Jet In Estonia Airspace : रशियन विमाने एस्टोनियाच्या हद्दीत; नाटोची प्रतिक्रिया, म्हणाले...

नवी दिल्ली : एस्टोनियाच्या हवाई हद्दीत शुक्रवारी तीन रशियन मिग-31 लढाऊ विमाने शिरल्याची माहिती सरकारने दिली. तब्बल 12 मिनिटे ही विमाने नाटो देशाच्या हवाई क्षेत्रात असल्याचे सांगण्यात आले. एस्टोनियाच्या परराष्ट्रमंत्री मार्गुस त्साह्कना यांनी याला "अत्यंत धाडसी व उघड उघड केलेले उल्लंघन" म्हटले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मात्र हे आरोप फेटाळले. त्यांचे म्हणणे आहे की विमाने तटस्थ बाल्टिक समुद्रावरील मार्गाने कालिनिनग्रादकडे जात होती आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसारच उड्डाण झाले. तरीही, पोलंडनेही दोन रशियन विमाने त्यांच्या समुद्री ड्रिलिंग प्लॅटफॉर्मच्या सुरक्षित क्षेत्रात घुसल्याचा दावा केला आहे.

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढलेला असतानाच ही घटना झाली. काही दिवसांपूर्वीच 20 हून अधिक रशियन ड्रोन पोलंडच्या हवाई हद्दीत शिरले होते. त्यामुळे रशिया नाटोची तयारी तपासत असल्याची भीती व्यक्त होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की त्यांना याची माहिती अद्याप पूर्ण मिळालेली नाही, मात्र हे "मोठ्या अडचणीचे कारण ठरू शकते." नाटोने या घटनेला "निर्लज्ज वर्तन" ठरवले आणि इटालियन F-35 विमानांच्या मदतीने रशियन विमाने बाहेर हाकलली. एस्टोनियाचे पंतप्रधान क्रिस्टन मिखाल यांनी नाटो करारातील कलम 4 अंतर्गत सल्लामसलत मागण्याचा निर्णय घेतला आहे. या कलमानुसार कोणत्याही सदस्य देशाच्या सुरक्षेला धोका असल्यास नाटो देशांमध्ये चर्चा केली जाते.

हेही वाचा : Manipur News : मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला; आसाम रायफल्सचे 2 जवान शहीद, 5 जखमी

युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा काल्लास यांनीही ही घटना "मुद्दाम केलेली चिथावणी" असल्याचे म्हटले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एस्टोनियाला पाठिंबा जाहीर करत "संयुक्त आणि कडक कारवाई" करण्याची मागणी केली. एस्टोनियाने स्पष्ट केले की ही विमाने वाइंडलू बेटाजवळ, राजधानी टॅलिनपासून 100 किमी अंतरावर शिरली होती. त्यांच्या ट्रान्सपाँडर यंत्रणा बंद होत्या, उड्डाण योजना नव्हत्या आणि हवाई नियंत्रणाशी संपर्क साधलेला नव्हता. त्यामुळे ही कृती जाणीवपूर्वक झाल्याचे मत पाश्चिमात्य तज्ज्ञांनी नोंदवले.