चीनमध्ये वटवाघळांमध्ये आढळला नवीन कोरोना विषाणू; किती धोकादायक आहे HKU5-CoV-2? जाणून घ्या
New Bat Coronavirus: चीनमधून पुन्हा एकदा एक भयानक बातमी समोर आली आहे. येथील वुहान प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी एक नवीन कोरोनाव्हायरस (HKU5-CoV-2) शोधला आहे, जो वटवाघळांमध्ये आढळला आहे. हा विषाणू कोविड-19 विषाणू वापरत असलेल्या रिसेप्टरद्वारे पेशींमध्ये प्रवेश करतो. या नवीन शोधामुळे प्राण्यांपासून मानवांमध्ये विषाणू पसरण्याची भीती पुन्हा एकदा वाढली आहे. या विषाणूमध्ये मानवांना संक्रमित करण्याची क्षमता आहे. कारण तो SARS-CoV-2 द्वारे वापरल्या जाणाऱ्या पेशींमध्ये प्रवेश करतो.
HKU5-CoV-2 म्हणजे काय?
HKU5-CoV-2 हा विषाणू चीनमध्ये वटवाघळांमध्ये आढळून आले आहे. हा विषाणू MERS कोरोनाव्हायरस कुटुंबातील आहे, परंतु तो मानवांसाठी किती मोठा धोका निर्माण करू शकतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राण्यांपासून मानवांमध्ये त्याच्या संक्रमण क्षमतेवर अजून संशोधन आवश्यक असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
नवीन विषाणू कसा पसरतो -
HKU5-CoV-2 मध्ये फ्युरिन क्लीवेज साइट नावाचे वैशिष्ट्य असल्याचे आढळून आले आहे, जे ते ACE2 प्रथिनाद्वारे पेशींमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते. कोविड-19 साथीच्या आजाराला कारणीभूत ठरलेल्या SARS-CoV-2 नेही हीच पद्धत अवलंबली होती. शास्त्रज्ञांनी टेस्ट ट्यूब आणि मानवी पेशींच्या मॉडेल्समध्ये चाचण्या केल्या, ज्यावरून असे दिसून आले की हा विषाणू आतड्यांमधील आणि श्वसनमार्गातील पेशींसारख्या जास्त प्रमाणात ACE2 प्रथिने असलेल्या पेशींना संक्रमित करू शकतो.
हेही वाचा - भारतीय वंशाचे Kash Patel बनले FBI प्रमुख; भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ
'बॅटवूमन' -
हे संशोधन चीनच्या प्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ शी झेंगली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले, ज्यांना बॅटवूमन म्हणून ओळखले जाते. त्या बऱ्याच काळापासून वटवाघळांमुळे पसरणाऱ्या कोरोनाव्हायरसचा अभ्यास करत आहे. हा अभ्यास ग्वांगझू प्रयोगशाळा, वुहान विद्यापीठ आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे केला.
नवीन कोरोना व्हायरल धोकादायक आहे का ?
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की HKU5-CoV-2 ची मानवी पेशींशी बांधण्याची क्षमता SARS-CoV-2 पेक्षा खूपच कमी आहे. याचा अर्थ असा की हा विषाणू मानवांमध्ये सहज पसरू शकत नाही. या विषाणूपासून तात्काळ कोणताही धोका नाही, परंतु त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक असेल.