आता दुप्पट शुल्क द्यावे लागेल! ट्रम्प आता 'या' देशाकडून 25 ऐवजी 50 टक्के शुल्क आकारणार
Donald Trump On Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी कॅनडासाठी स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवरील सीमाशुल्क 25 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. यामुळे दोन्ही शेजारी देशांमधील व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता दिसते. शुल्क वाढवण्याचा हा निर्णय बुधवारपासून लागू होणार आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, कॅनडाच्या प्रांतीय सरकारने अमेरिकेला विकल्या जाणाऱ्या विजेच्या किमती वाढवण्याच्या निर्णयाला प्रतिसाद म्हणून ही दरवाढ करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी माझ्या वाणिज्य मंत्र्यांना कॅनडामधून अमेरिकेत येणाऱ्या सर्व स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवर अतिरिक्त 25 टक्के शुल्क लादण्याचे निर्देश दिले आहेत. हा जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे.
हेही वाचा - PM Modi Gifts Maha Kumbh Jal: पंतप्रधान मोदींनी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेट म्हणून दिलं महाकुंभाचे गंगाजल
जगभरातील अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची भीती -
जानेवारीमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून, ट्रम्प चीन, कॅनडा आणि मेक्सिको येथून होणाऱ्या आयातीवरील सीमाशुल्क वाढवण्याबद्दल सतत बोलत आहेत. यासोबतच त्यांनी भारतासह अनेक देशांवर प्रत्युत्तरात्मक सीमाशुल्क लादण्याची घोषणाही केली आहे. या घोषणांमुळे अमेरिकेसह जगभरातील अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण -
ट्रम्प यांची ही सोशल मीडिया पोस्ट येताच अमेरिकन शेअर बाजारात लगेचच घसरण झाली. तथापि, डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलपासून भारत आणि चीनवर कर लादण्याची घोषणा केली आहे. फेब्रुवारीमध्ये, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले होते की, त्यांचे प्रशासन लवकरच भारत आणि चीनसारख्या देशांवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादेल, हे विधान त्यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान देखील केले होते. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना स्पष्ट केले आहे की, अमेरिकेच्या प्रत्युत्तरात्मक शुल्कापासून भारताला वाचवले जाणार नाही. तसेच शुल्क रचनेवर कोणीही त्यांच्याशी वाद घालू शकत नसल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं होतं.