Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा एकदा स्फोटाने हादरला! सुरक्षा दलांच्या अनेक बसेसमध्ये भीषण स्फोट; 90 सैनिकांचा मृत्यू
Pakistan Blast: रेल्वे अपहरणानंतर पाकिस्तानमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. पाकिस्तानला आणखी एका नवीन स्फोटाने हादरवून टाकले आहे. या स्फोटात 90 पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) च्या एका तरुण नेत्याने केला आहे. रविवारी अशांत नैऋत्य पाकिस्तानमध्ये सुरक्षा दलांना घेऊन जाणाऱ्या बसजवळ रस्त्याच्या कडेला बॉम्बस्फोट झाला. त्याचवेळी, एपीने दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात किमान पाच अधिकारी ठार झाले आणि इतर 10 जण जखमी झाले.
स्थानिक पोलिस प्रमुख जफर जमानानी यांनी सांगितले की, हा हल्ला बलुचिस्तानमधील नौश्की जिल्ह्यात झाला. त्यांनी सांगितले की, स्फोटात जवळच असलेल्या दुसऱ्या बसचेही मोठे नुकसान झाले आहे. मृत आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या हल्ल्याचा निषेध केला. अद्याप, कोणीही ताबडतोब जबाबदारी स्वीकारली नाही. परंतु, बलुच लिबरेशन आर्मीवर या हल्ल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एका ट्रेनवर हल्ला केला होता आणि सुमारे 400 लोकांना ओलीस ठेवले होते आणि 26 जणांना ठार मारले होते.
या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी मारले गेल्याचा दावा बलुचिस्तान पोस्टने केला आहे. बीएलएचा हवाला देत बलुचिस्तानने हा दावा केला आहे. तसेच, स्फोटानंतरचे फोटोही इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.
पाकिस्तानला बलुच आर्मीचावर संशय -
या स्फोटामागे बलुच आर्मीचा हात असल्याचा पाकिस्तानला संशय आहे. तेल आणि खनिजांनी समृद्ध बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा आणि कमी लोकसंख्या असलेला प्रांत आहे. वांशिक बलुच रहिवासी बऱ्याच काळापासून केंद्र सरकारवर भेदभावाचा आरोप करत आहेत. बलुच लिबरेशन आर्मी केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याची मागणी करत आहे.