वृत्तानुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून काही धातूचे त

पाकिस्तान हादरला! लाहोरनंतर कराचीमध्येही स्फोट

Blast in Karachi प्रतिकात्मक प्रतिमा

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या कराची शहरात स्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे. कराचीतील शराफी गोथजवळ मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. वृत्तानुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून काही धातूचे तुकडे जप्त केले असून स्फोटाचे स्वरूप तपासले जात आहे. स्थानिक प्रशासनाने सांगितले की, बचाव आणि कायदा अंमलबजावणी पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. या स्फोटानंतर कराचीमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये स्फोट - 

दरम्यान, कराची, गुजरांवाला, लाहोर, चकवाल, उमरकोट आणि घोटकीसह पाकिस्तानातील सुमारे 6 शहरांमध्ये ड्रोन हल्ल्यांचे वृत्त आहे. हल्ल्याचे काही अपुष्ट व्हिडिओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये इमारतींचे नुकसान आणि गोंधळ दिसून येत आहे. या भागात जवळजवळ आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. तथापि, अद्याप कोणीही या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. 

हेही वाचा - मोठी बातमी! बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर हल्ला; 12 जवानांचा मृत्यू

लाहोरमध्येही स्फोट - 

कराचीमध्ये झालेल्या स्फोटापूर्वीच आज सकाळपासून पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी सकाळी पाकिस्तानातील लाहोर विमानतळावर स्फोट झाला. अशातचं बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीनेही लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. गुरुवारी  पाकिस्तानातील सर्वात प्रसिद्ध शहर लाहोरमध्ये सुमारे तीन स्फोट झाल्याचे वृत्त आले. मिळालेल्या माहितीनुसार, हे स्फोट लाहोर विमानतळाजवळ झाले. पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण परिसर सील केला आहे आणि परिसरात सायरनचा आवाज ऐकू येत आहे. पाकिस्तानच्या स्थानिक जिओ न्यूजने या स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा - Operation Sindoor: सॅटेलाइट फोटोने उघड केलं पाकिस्तानचं विध्वंसित रूप

लष्कराच्या वाहनावर हल्ला - 

याशिवाय, बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला केला. या स्फोटात 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर येत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यासाठी बीएलएने आयईडीचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये आयईडी स्फोट किती शक्तिशाली होता हे स्पष्टपणे दिसून येत आहे. या आयईडी स्फोटानंतर लष्कराच्या वाहनाचे तुकडे झाले.