भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्याने पाकिस्तान हादरला! संरक्षण मंत्री म्हणाले, 'आम्ही तणाव संपवण्यास तयार आहोत'
इस्लामाबाद: बुधवारी मध्यरात्री भारताने पाकिस्तामधील दहशतवादी तळावर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हवाई हल्ला केला. या हल्ल्यामुळे आता पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. पाकिस्तान आता भारतासोबतचा तणाव कमी करू इच्छित आहे. मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
दोन्ही देशामधील तणाव संपवण्यास तयार - ख्वाजा आसिफ
दरम्यान, याआधी भारताला धमकी देणारे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा सूर आता बदलला आहे. ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी सांगितले की, 'जर भारताने मवाळ भूमिका घेतली तर पाकिस्तान तणाव संपवण्यास तयार आहे.' पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या काही तासांनंतरच ख्वाजा आसिफ यांचे हे विधान समोर आले आहे.
हेही वाचा - भारतीय सैन्याने जारी केला ऑपरेशन सिंदूरचा व्हिडिओ; पहा भारताने कसे केले 'सर्जिकल स्ट्राईक'
ख्वाजा आसिफ काय म्हणाले?
ब्लूमबर्ग टेलिव्हिजननुसार, पाकिस्तानचे मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे की, 'पाकिस्तानवर हल्ला झाला तरच देश प्रत्युत्तर देईल. आम्ही गेल्या पंधरवड्यापासून सतत सांगत आहोत की आम्ही कधीही भारताविरुद्ध कोणतीही शत्रुत्वाची कारवाई करणार नाही. पण जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. जर भारताने मवाळ भूमिका घेतली तर आम्ही निश्चितच हा तणाव संपवू.'
हेही वाचा - ऑपरेशन सिंदूरची मीडिया ब्रीफिंग देणाऱ्या कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका कोण आहेत?
तत्पूर्वी, पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या हवाई हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, त्यांच्या सशस्त्र दलांना शत्रूशी कसे सामोरे जायचे हे चांगले माहित आहे. भारताने केलेल्या या युद्धाच्या कृत्याला योग्य उत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे. आम्ही शत्रूला त्याच्या वाईट हेतूंमध्ये कधीही यशस्वी होऊ देणार नाही.