Earthquake in Chile and Argentina: अर्जेंटिना आणि चिलीमध्ये जोरदार भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी
Earthquake in Chile and Argentina: काही दिवसांपूर्वी थायलंड आणि म्यानमारमध्ये भूकंपामुळे मोठा विध्वंस झालेला पाहायला मिळाला होता. आता दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिना आणि चिलीची जमीन शुक्रवारी झालेल्या तीव्र भूकंपामुळे हादरली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 मोजण्यात आली. भूकंपाची तीव्रता लक्षात घेता, त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक घराबाहेर पडून उघड्या जागेकडे धाव घेताना दिसले. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, भूकंपाचे केंद्र चिली आणि अर्जेंटिनाच्या दक्षिण किनाऱ्याजवळील समुद्रात होते. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
परिसर रिकामा करण्याचे आदेश -
दरम्यान, त्सुनामीच्या धोक्यामुळे, चिलीच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि प्रतिसाद सेवेने अंटार्क्टिक आणि मॅगेलन किनारपट्टीवरील रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. केप हॉर्न आणि अंटार्क्टिका दरम्यान ड्रेक पॅसेजमध्ये फक्त 10 किमी (6 मैल) खोलीवर भूकंप झाल्याचे यूएसजीएसने म्हटले आहे.
हेही वाचा - अवकाशातही होतो भूकंप! त्यांचा पृथ्वीवर परिणाम होतो का? जाणून घ्या
भूकंपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल -
सोशल मीडियावर भूकंपाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात प्वेर्टो विल्यम्समध्ये त्सुनामीचा इशारा देणारे सायरन वाजत असल्याचे आणि स्थानिक लोक सुरक्षित ठिकाणी जात असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - Pakistan Earthquake: पाकिस्तानला भूंकपाचा तडाखा! 5.8 रिश्टर स्केलवर मोजण्यात आली तीव्रता
त्सुनामीचा इशारा जारी -
तथापि, यूएसजीएसने सांगितले की, भूकंपाचे केंद्र अर्जेंटिनाच्या उशुआइया शहराच्या किनाऱ्यापासून 219 किलोमीटर अंतरावर होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता भूकंप झाला. चिलीतील प्वेर्टो विल्यम्समध्ये त्सुनामीचा इशारा देण्यासाठी सायरन वाजवण्यात आला. भूकंपानंतर लोक उंच ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. अमेरिकेच्या त्सुनामी इशारा यंत्रणेने भूकंपाच्या केंद्रापासून 300 किलोमीटर अंतराच्या किनारी भागात धोकादायक लाटा उसळण्याचा इशारा दिला आहे.