Nepal Interim PM: सुशीला कार्की यांनी नेपाळच्या प्रभारी पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला; आज मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित
Sushila Karki Takes Charge as Interim PM: नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांनी रविवारी देशाच्या पहिल्या महिला प्रभारी पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. शनिवारी झालेल्या शपथविधी समारंभात कार्की यांच्यासह नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. संसद विसर्जित करून केपी शर्मा ओली सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी कार्की यांची नियुक्ती केली. अंतरिम सरकारला पुढील सहा महिन्यांत निवडणुका आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कार्की यांच्या मंत्रिमंडळात माजी लष्करप्रमुख बालानंद शर्मा पौडेल यांना गृहमंत्री, तर कुलमन घिसिंग यांना जलसंपदा व वीज मंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे. ओम प्रकाश अर्याल कायदा मंत्री झाले असून तरुण नेते सुदान गुरुंग यांची माहिती व प्रसारण मंत्री म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. काठमांडूमधील सिंह दरबार व कार्की यांच्या निवासस्थानाजवळ सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा - 'या' देशात 1 लाखांपेक्षा अधिक निदर्शक रस्त्यावर, पोलिसांवर हल्ला, नेमकं काय घडलं?
हा बदल देशभर सुरू असलेल्या जनरेशन-झेड तरुणांच्या नेतृत्वाखालील आंदोलनांनंतर झाला आहे. पारदर्शक व तात्पुरत्या नेतृत्वाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी थेट राष्ट्रपती व लष्करप्रमुखांशी वाटाघाटी करून हा बदल साध्य केला.
कोण आहेत सुशीला कार्की?
1979 पासून कायदा व्यवसायात सक्रिय असलेल्या कार्की यांची 2016 मध्ये नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. भ्रष्टाचारविरोधी कठोर भूमिकेमुळे त्यांना देशात प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली असून त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे.