चीनने आपल्या देशात आयात होणाऱ्या अमेरिकन उत्पादनां

चीन आणि अमेरिकेत पेटलं टॅरिफ युद्ध! चीनने अमेरिकन वस्तूंवरील कर 125% पर्यंत वाढवला

China US Tariff War

China US Tariff War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादलेल्या 145 टक्के करला आता चीनने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चीनने आपल्या देशात आयात होणाऱ्या अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क 84 टक्क्यांवरून 125 टक्के केले आहे. या निर्णयामुळे चीनकडून एक स्पष्ट संकेत मिळतो की, चीन आता या व्यापार युद्धात मागे हटण्यास तयार नाही. 

अमेरिकेच्या नवीन अधिसूचनेनुसार, चीनवर एकूण 145 टक्के शुल्क लादण्यात आले आहे. चीनने यापूर्वी 84 टक्के शुल्क लादून काही अमेरिकन कंपन्यांच्या आयातीवर बंदी घालून प्रत्युत्तर दिले होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी चीनने अमेरिकेशी चर्चा करण्यासही रस दर्शविला होता. अमेरिकेच्या शुल्काविरुद्ध प्रत्युत्तर देणारा चीन हा आतापर्यंतचा एकमेव देश आहे.

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार युद्धामुळे भारतात स्मार्टफोन, फ्रिज, TV यापैकी काय स्वस्त होईल? जाणून घ्या

WTO मध्ये खटला दाखल - 

दरम्यान, अमेरिकेच्या करवाढीनंतर चीनने जागतिक व्यापार संघटनेतही खटला दाखल केल्याचे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने सांगितले. त्याच वेळी, चीनचे अध्यक्ष जिनपिंग म्हणाले की, बाहेरील जगात कोणतेही बदल झाले तरी चीन आशावादी राहील आणि आपले व्यवहार चांगल्या प्रकारे चालवण्यावर लक्ष केंद्रित करेल. गेल्या 70 वर्षात देशाने स्वावलंबन आणि कठोर संघर्षातून विकास साधला आहे. चीन कधीही इतरांच्या दयेवर अवलंबून राहिलेला नाही आणि कोणत्याही अन्याय्य दडपशाहीला कधीही घाबरला नाही.

हेही वाचा - नवीन टॅरिफ मागे घ्या...! एलोन मस्क यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन

चीन शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्युत्तर देईल - 

तथापी, चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी यापूर्वी टॅरिफशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या चर्चेच्या प्रश्नाला उत्तर देताना पत्रकार परिषदेत चीनची भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले की, चीनचा दृष्टिकोन नेहमीच स्पष्ट आणि स्थिर राहिला आहे. चीन चर्चेसाठी तयार असून त्यासाठी दरवाजे उघडे ठेवतो, परंतु या चर्चा दोन्ही बाजूंमधील समानता आणि परस्पर आदरावर आधारित असाव्यात. जर अमेरिकेला टॅरिफ वॉर सुरू करायचा असेल तर चीनही शेवटच्या श्वासापर्यंत त्याला प्रत्युत्तर देण्यास तयार असेल, असा कडक इशारा चीनच्या प्रवक्त्यांनी दिला आहे.