North Macedonia : लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान भीषण आग, ५१ जणांचा मृत्यू, १०० पेक्षा जास्त लोक जखमी
उत्तर मॅसेडोनियाच्या कोकानी शहरात आज रविवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. ‘पल्स’ नावाच्या नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीमुळे ५१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर १०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. जेव्हा हिप-हॉप ग्रुप ‘डीएनके’ यांचा लाइव्ह कॉन्सर्ट सुरू होता. क्लबमध्ये सुमारे दीड हजार लोक उपस्थित होते.
कार्यक्रमात वापरण्यात आलेल्या आतिषबाजीतून निघालेल्या ठिणग्यांमुळे छताने पेट घेतला आणि काही क्षणातच संपूर्ण क्लब जळू लागला, असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीतून सुटण्यासाठी क्लबमधील लोकांमध्ये अफरातफरी माजली. अनेक जण गोंधळून धुराच्या जाळात अडकले. काहींनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे निघण्याचे मार्ग अपुरे ठरले.
या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये लोक घाबरलेले दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये काही जण मदतीसाठी ओरडताना दिसतायेत. तर काही जण दाराजवळ एकमेकांना ढकलत आहेत.
या दुर्घटनेनंतर त्वरित अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा कार्यरत झाल्या. पण आगीने चांगलाच पेट घेतला होता. यामुळं बचावकार्य करताना देखील अडथळे येत होते. जखमींना तातडीने कोकानी, स्टिप आणि स्कोप्जे येथील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं. अनेकांना गंभीर भाजल्या असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
उत्तर मॅसेडोनियाचे पंतप्रधान ह्रीस्टिजान मिकोस्की यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेविषयी सोशल मीडिया पोस्ट लिहली आहे. त्यात त्यांनी ही आमच्या देशासाठी एक मोठी शोकांतिका आहे. अनेक तरुणांचे प्राण गेले आहेत, हे फारच वेदनादायक आहे, असं म्हटलं आहे. तसंच त्यांनी सरकार या परिस्थितीत पीडित कुटुंबांना मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं आश्वासन दिलं आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. अनेक युरोपीय नेत्यांनी उत्तर मॅसेडोनिया सरकारशी संपर्क साधून मदतीची तयारी दर्शवली आहे.