'ऑफिसमध्ये 60 तास काम करा नाहीतर...'; गुगलच्या मालकाचे कर्मचाऱ्यांना नवे फर्मान
सध्या कार्यालयातील कामाच्या वेळेबद्दल खूप चर्चा होते. अनेक दिग्गज यावर विधानं करत आहेत. त्यांची विधाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलिकडेच, एल अँड टीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांनी आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या विधानानंतर काही लोकांनी ते बरोबर असल्याचे म्हटले तर बहुतेक लोकांनी ते विधान हास्यास्पद असल्याचे म्हटले. आता जगातील आघाडीची टेक कंपनी गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांनी कामाच्या वेळेबाबत आपले मत मांडले असून त्यांनी कर्मचाऱ्यांना एक विनंती केली आहे. ही विनंती कामाच्या वेळेशी संबंधित आहे. त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, प्रत्येक कर्मचाऱ्याने आठवड्यातून किमान 60 तास काम केले पाहिजे.
सध्या गुगलला ओपनएआय, मेटा, एलोन मस्कच्या एक्सएआय आणि चीनमधील डीपसीक यांच्याकडून मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना लक्ष केंद्रित करून काम करण्यास सांगत आहे. द न्यू यॉर्क टाईम्सच्या मते, 26 फेब्रुवारी रोजी अंतर्गत पोस्ट केलेल्या मेमोमध्ये ब्रिन यांनी किमान प्रत्येक आठवड्याच्या दिवशी कार्यालयात येण्याची शिफारस केली.
AI टीममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला संदेश -
सर्गेई ब्रिन यांनी म्हटलं आहे की, मी कमीत कमी प्रत्येक कामाच्या दिवशी ऑफिसमध्ये असण्याची शिफारस करतो. आठवड्यातून साठ तास हा उत्पादकतेसाठी सर्वोत्तम वेळ आहे. त्यांनी हा संदेश विशेषतः गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस मॉडेल आणि अॅप जेमिनी टीममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दिला आहे.
AI स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न वेगवान करण्याची आवश्यकता -
सर्गेई ब्रिन यांनी म्हटलं आहे की, मला वाटते की ही एआय शर्यत जिंकण्यासाठी आपल्याकडे सर्वकाही आहे. परंतु आपल्याला आपले प्रयत्न वेगवान करण्याची आवश्यकता आहे. सर्गेई ब्रिन यांच्या संदेशानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्याच्या आधारावर कामकाजाच्या दिवशी दररोज 12 तास काम करावे लागेल. यासोबतच काही कर्मचाऱ्यांबद्दल त्यांनी असेही म्हटले की, ते त्यांचे काम योग्यरित्या करत नाहीत. याचा अर्थ काही कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात आहेत.