World Largest Digital Camera Launched: जगातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा लाँच; काय आहे खास? जाणून घ्या
World Largest Digital Camera Launched: जगातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा व्हेरा सी. रुबिन वेधशाळेत बसवण्यात आला आहे. या कॅमेऱ्याद्वारे खगोलीय घटनांवर लक्ष ठेवले जाईल. या डिजिटल कॅमेऱ्याचा झूम इतका जास्त आहे की, तुम्हाला या कॅमेऱ्याद्वारे दूरवरचे ग्रह आणि आकाशगंगा देखील पाहता येते. या डिजिटल कॅमेराला लार्ज सिनोप्टिक सर्व्हे टेलिस्कोप (LSST) असेही म्हणतात. हे आतापर्यंत बनवलेले सर्वात मोठे डिजिटल इमेजिंग उपकरण आहे, ज्याद्वारे पुढील 10 वर्षांसाठी दक्षिण ध्रुवाच्या दिशेने आकाशाचे तपशीलवार निरीक्षण केले जाईल.
विश्वाच्या कालांतराची नोंद करण्यास होणार मदत -
हा मोठा LSST कॅमेरा सिमोनई सर्व्हे टेलिस्कोपवर यशस्वीरित्या स्थापित करण्यात आला आहे. लवकरच, त्याची अंतिम चाचणी केली जाईल. यानंतर वेधशाळा पूर्णपणे कार्यरत होऊ शकेल. या मोठ्या डिजिटल कॅमेराच्या स्थापनेसाठी यूएस नॅशनल सायन्स फाउंडेशन (NSF) आणि ऊर्जा विभाग (DOE) यांनी आर्थिक मदत केली आहे. त्याचा उद्देश विश्वाच्या कालांतराची नोंद करणे आहे.
LSST कॅमेऱ्याने अद्वितीय खगोलीय मॅपिंग शक्य -
NSF-DOE व्हेरा सी. रुबिन वेधशाळेनुसार, LSST कॅमेरा रात्री संपूर्ण आकाशाचे पद्धतशीरपणे सर्वेक्षण करेल आणि अभूतपूर्व प्रमाणात उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा प्रदान करेल. वेधशाळेच्या अधिकृत निवेदनानुसार, एकच प्रतिमा इतकी तपशीलवार असेल की ती प्रदर्शित करण्यासाठी 400 अल्ट्रा-एचडी टेलिव्हिजन स्क्रीनची आवश्यकता असेल. या क्षमतेसह, हा कॅमेरा सुपरनोव्हा, लघुग्रह आणि तारे यासारख्या खगोलीय घटना टिपण्यास सक्षम असेल, ज्यामुळे वैश्विक घटनांच्या आकलनाला एक नवीन दिशा मिळेल.
आकाशगंगेतील अनेक रहस्य उलगडणार -
दरम्यान, अमेरिकेतील वेरा सी. रुबिन वेधशाळेचे नाव खगोलशास्त्रज्ञ वेरा रुबिन यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. त्यांनी त्यांचे सहकारी केंट फोर्ड यांच्यासोबत संशोधन करून शोधून काढले की, गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनुसार अपेक्षित वेगाने आकाशगंगा फिरत नाहीत. यावरून असे दिसून येते की काही गडद पदार्थ या आकाशगंगांवर प्रभाव पाडतात. या डिजिटल कॅमेरामुळे या आकाशगंगांमध्ये असलेल्या डार्क मॅटरचे परिणाम मोजण्यास देखील मदत होईल.