Zelensky Dials PM Modi: झेलेन्स्कींची पंतप्रधान मोदींशी चर्चा; शांतता प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
Zelensky Dials PM Modi: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून भारताच्या शांतता प्रयत्नांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले की, 'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझी दीर्घ चर्चा झाली. आम्ही सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आहे. आमच्या लोकांना दिलेल्या उबदार पाठिंब्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे.' झेलेन्स्की यांनी या संवादात रशियाच्या सतत सुरू असलेल्या हल्ल्यांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, 'काल झापोरिझिया येथील बस स्थानकावर रशियाने जाणूनबुजून केलेल्या बॉम्बस्फोटात डझनभर लोक जखमी झाले. हा हल्ला त्या वेळी झाला जेव्हा युद्ध संपवण्याची राजनैतिक शक्यता होती. पण युद्धबंदीची तयारी दाखवण्याऐवजी, रशिया केवळ कब्जा आणि हत्या सुरू ठेवत आहे.'
हेही वाचा - युक्रेनच्या राजकारणात ऐतिहासिक वळण! युलिया स्वीरिडेन्को बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
भारताचा ठाम पाठिंबा -
झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, भारत आमच्या शांतता प्रयत्नांना ठाम पाठिंबा देत आहे आणि युक्रेनशी संबंधित सर्व गोष्टी युक्रेनच्या सहभागानेच ठरवल्या पाहिजेत या भूमिकेशी सहमत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आमच्यात रशियाविरुद्धच्या निर्बंधांवर देखील चर्चा झाली, ज्यात विशेषतः रशियन तेल आणि ऊर्जेच्या निर्यातीवर मर्यादा आणण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. रशियावर ठोस प्रभाव असलेल्या प्रत्येक नेत्याने मॉस्कोला स्पष्ट संदेश द्यावा, असेही झेलेन्स्की यांनी नमूद केले. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान वैयक्तिक भेट घेण्याचे ठरवले आहे.
रशियासोबतच्या युद्धबंदीबाबत पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आणि पूर्वी दिलेल्या आश्वासनाचा पुनरुच्चारही केला. तसेच, दोन्ही देशांच्या हितासाठी परस्पर सहकार्य आणखी वाढवण्याच्या मार्गांवरही चर्चा झाली. त्याच वेळी, झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट केली.