Thursday, September 18, 2025 09:42:08 PM

Ayush Komkar Murder Case: माजी नगरसेविका सोनाली आंदेकरच्या अटकेसह संपूर्ण कुटुंबच पोलिसांच्या ताब्यात

सोनाली आंदेकर काही दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होती. अखेर, पोलिसांनी तिला राहत्या घरातून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे आंदेकर कुटुंबातील सर्व सदस्य आता पोलिसांच्या ताब्यात असल्याचे चित्र आहे.

ayush komkar murder case माजी नगरसेविका सोनाली आंदेकरच्या अटकेसह संपूर्ण कुटुंबच पोलिसांच्या ताब्यात

पुणे : शहरातील टोळी युद्धातून झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत आंदेकर कुटुंबातील अनेक सदस्य पोलिसांच्या ताब्यात असून, आता माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी आणि माजी नगरसेविका सोनाली आंदेकर हिला अटक करण्यात आली आहे.

सोनाली आंदेकर काही दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होती. अखेर, पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (18 सप्टेंबर) दुपारी तिच्या राहत्या घरातून तिला ताब्यात घेतले. तिच्यासोबतच कृष्णा आंदेकरच्या पत्नीलाही चौकशीसाठी नेण्यात आले आहे. या कारवाईमुळे आंदेकर कुटुंबातील सर्व सदस्य आता पोलिसांच्या ताब्यात असल्याचे चित्र आहे.

नेमकं प्रकरण काय?
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नातेवाईक असलेल्या गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे आंदेकर टोळीतील अंतर्गत वाद अधिक चिघळला.

मुख्य आरोपी : या प्रकरणात टोळीचा म्होरक्या बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (70) याच्यासह 13 जणांविरोधात खून आणि 'मकोका' अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
हत्येचा कट : आयुषच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत सोनाली आंदेकरवर हत्येचा कट रचल्याचा थेट आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांनंतर तिच्यावर ही कारवाई केली.
राजकीय चर्चा : सोनाली आंदेकरला आगामी महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. तसेच, तिने निवडणुकीची तयारी केल्याचेही ऐकायला मिळत होते. मात्र, या खूनप्रकरणात नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - Ayush Komkar Murder Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणीबाबत मोठी अपडेट! आंदेकर टोळीतील चौघांना गुजरातमधून अटक

कृष्णा आंदेकरचा सहभाग
पोलिसां तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कृष्णा आंदेकरनेच मारेकऱ्यांना पिस्तूल पुरवले होते. तो या खून प्रकरणातील मारेकरी आणि कट रचणारे यांच्यातील मुख्य दुवा आहे. हे शस्त्र त्याला नेमके कुठून मिळाले, फरारी असताना तो कोणत्या संपर्कात होता आणि गुन्ह्याचे पुरावे नष्ट केले का, याचा तपास अद्याप सुरू आहे.

या खटल्यातील आरोपी आणि बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर (36) हा आयुषच्या खुनानंतर फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर याने सार्वजनिकरित्या "कृष्णाचा शोध द्या, नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल," असा दावा केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाला.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची नावे
बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाटोळे आणि सुजल मिरगू यांना याआधीच अटक झाली होती. आता मुनाफ पठाण आणि सोनाली आंदेकर यांनाही अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - Sangli Fake IT Raid Loot Case : सांगली हादरली! 'स्पेशल 26' स्टाईलने डॉक्टरच्या घरात दरोडा, 2 कोटींचा ऐवज लुटला


सम्बन्धित सामग्री