मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या हिंदी-मराठी भाषेच्या वादावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली. अशातच, अभिनेता आर माधवनचा 'आप जैसा कोई' हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. यादरम्यान, जेव्हा राज्यात सुरू असलेल्या हिंदी-मराठी भाषेच्या वादावर जेव्हा बॉलीवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवनला प्रश्न विचारण्यात आलं, तेव्हा आर. माधवन म्हणाला की, 'भाषेमुळे काम कधीच थांबले नाही'.
काय म्हणाला आर. माधवन?
मराठी विरुद्ध हिंदी भाषा वादावर आर. माधवन म्हणाला की, 'मी तामिळ आहे, पण मला हिंदी उत्तम येतं. मी जमशेदपूर येथे मोठा झालो, त्यामुळे तिथे हिंदीच बोलली जायची. त्यानंतर, मी शिक्षणासाठी कोल्हापुरात राहिलो. तिथे मी मराठीही शिकलो. त्यामुळे, मला भाषेची अडचण कधीच वाटली नाही. जिथे मी राहिलो, तिथली भाषा मी शिकली. त्यामुळे, मला संवाद साधण्यास कधीही अडचण आली नाही. भाषा ही आपल्याला जोडण्यासाठी असते, तोडण्यासाठी नाही'.
हेही वाचा: बोगीवर अडकलेला चेंडू काढण्यासाठी गेलेल्या 10 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू
अभिनेता आर. माधवनने कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधून बी.एससी इलेक्ट्रॉनिक्समधून शिक्षण पूर्ण केलं. या कॉलेजमध्ये शिकत असताना त्याने एनसीसीमध्येही सहभाग घेतला होता. कोल्हापूरशी आर. माधवनचं खास नातं आहे. मुलाखतीदरम्यान, आर. माधवनने अनेकदा कोल्हापुरातील आणि कॉलेजच्या दिवसांच्या आठवणींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
2021 रोजी आर. माधवनने कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीकडून डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट.) ही पदवी मिळवली. 'कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीकडून डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट.) ही पदवी मिळाल्याबद्दल मी खूप नम्र आणि आभारी आहे. हा आता एक सन्मान आणि जबाबदारी आहे', ही माहिती आर. माधवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिली.
अशातच, अभिनेता आर माधवनचा 'आप जैसा कोई' हा सिनेमा 11 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात आर. माधवन फातिमा सना शेखसोबत मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी आर. माधवनचे विशेष कौतुक होत आहे. बऱ्याच वर्षानंतर, आर. माधवन एका रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसत आहे.