Wednesday, August 20, 2025 10:36:28 AM

Kolhapur Rain, Travel Update : कोल्हापूर जिल्ह्यातले हे मार्ग बंद; अनावश्यक प्रवास न करण्याचा सल्ला

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची धुवाँधार इनिंग सुरू आहे. जिल्ह्यातील 27 मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गांवरुन वाहतुक सुरू आहे.

kolhapur rain travel update  कोल्हापूर जिल्ह्यातले हे मार्ग बंद अनावश्यक प्रवास न करण्याचा सल्ला

कोल्हापूर :  जिल्ह्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. पंचगंगा नदीचे पाणी 36 फुटांच्या पुढे पोहोचले आहे. पंचगंगेची आता इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. साधानगरी धरणाचे सातही दरवाजे यापूर्वीच उघडले आहेत. जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणातूनही विसर्ग वाढवला आहे. यासह सांगली जिल्ह्यातही चांदोली धरणातून विसर्ग वाढवला आहे. या धरणाच्याही पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पावसाची धुवाँधार इनिंग सुरू असल्यामुळे जनतेला प्रवास करताना सावधानतेचा आणि अनावश्यक प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात देत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातले हे मार्ग बंद (Kolhapur Road Closed)
जिल्ह्यात 65.5 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 80 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. लोंघे व मांडुकली येथे पाणी आल्याने गगनबावडा महामार्ग पूर्ण बंद झाला आहे. तर बाजारभोगाव येथे पाणी आल्याने कळे ते अणुस्कुरा मार्ग बंद झाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील 27 मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गांवरुन वाहतुक सुरू आहे. अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग बंद झाला. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचे आता ढगफुटीसदृश्‍य पावसात रुपांतर झाले आहे.

कोल्हापुरात राष्ट्रीय महामार्गावर पाणी आले आहे. कोकणात जाणारे दोन घाट बंद झाले आहेत. अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  नद्या, नाल्यांमधील पाणी वाढल्याने जिल्ह्यातील चार राज्य मार्ग, 12 प्रमुख जिल्हा मार्ग, 10 ग्रामीण मार्ग व एक इतर जिल्हा मार्ग बंद झाला आहे. येथील वाहतूक आसपासच्या पर्यायी मार्गांवरुन सुरु आहे. गगनबावडा महामार्गावरील वाहतुक राधानगरीमार्गे वळविण्यात आली आहे.

हेही वाचा - Maharashtra Dam : राज्यातील 11 मोठी धरणे पूर्ण भरली; 19 ऑगस्टपर्यंत कुठल्या धरणात पाणी किती?

राधानगरी, कोयना, अलमट्टी धरणातून एवढा विसर्ग
राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांमधून सध्या 11 हजार 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर अलमट्टी धरणातील विसर्ग वाढवून तो दीड लाख क्युसेक्स व कोयना धरणातील विसर्ग वाढवून 53 हजार 300 क्युसेक्स करण्यात आला आहे.

सतर्कतेचे आदेश
महापालिका आयुक्तांकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांच्या स्थलांतरित ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून त्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील धोकादायक व उन्मळून पडलेली झाडे उद्यान व अग्निशमन विभागाच्या मदतीने हटवली जात आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास जनतेला औषधे, पाण्याचे टँकर व आवश्यक साहित्य तत्परतेने उपलब्ध राहावे, यासाठी व्यवस्था करण्याचे  आदेश महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा - Weather Update : मुंबईची पावसाने दाणादाण; लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम रेल्वेची महत्वाची अपडेट जाणून घ्या


सम्बन्धित सामग्री