नवी दिल्ली : मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भाषण करताना आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. “मराठी सारस्वतांना माझा नमस्कार”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात केली.
“आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला आहे. मी जेव्हा मराठी भाषेबाबत विचार करतो. तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके, म्हणजे मराठी भाषा ही अमृताहूनी गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रति माझं प्रेम आहे. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा - 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : दिल्लीत पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन, भवाळकरांचा जैविक जन्मावरून टोला
अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे भाग्य लाभले - पंतप्रधान मोदी
जगभरात १२ कोटीहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा, यासाठी कोट्यवधी लोक दशकांपासून वाट पाहत होते. काही महिन्यांपूर्वी अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे कार्य माझ्या हातून झाले. हे माझे भाग्य समजतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी छावा चित्रपट आणि कादंबरीचा उल्लेख केला
“मराठीचा जेव्हा जेव्हा विषय येतो, तेव्हा मुंबई आणि चित्रपटांचा विषय आल्याशिवाय राहत नाही. मुंबईनेच मराठी आणि हिंदी चित्रपटांना उभारी दिली. आता तर ‘छावा’ची धूम आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख करताच दिल्लीच्या विज्ञान भवनात जय भवानी, जय संभाजी अशा घोषणा दिल्या गेल्या. टाळ्यांच्या कडकडाट करत उपस्थितांनी दाद दिली. यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कांदबरीने करून दिला.
पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांना खुर्चीत बसवलं आणि ग्लासमध्ये पाणी ओतून दिलं.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात आधी शरद पवार यांनी भाषण केलं. भाषण केल्यानंतर शरद पवार पुन्हा व्यासपीठावरील आपल्या खुर्चीवर येऊन बसले. मात्र, शरद पवार यांना खुर्चीवर बसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर स्वत: बाटलीतील पाणी ग्लासात घेऊन शरद पवार यांना दिलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीचे सर्वांनी कौतुक केलं आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
हेही वाचा - 'पप्पांनी मम्मीला मारलं, मग...' 4 वर्षांच्या मुलीने काढलेल्या चित्रामुळे आईच्या खुनाचा उलगडा, पोलिसही अवाक्
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण, अशा वेळी साहित्य संमेलन होणं हे खास
“मराठी साहित्य संमेलन अशा वेळी होत आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाले आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे ३०० वर्ष पूर्ण झाले आहेत. तसेच आपल्याला या गोष्टींचा गर्व आहे की महाराष्ट्राच्या धर्तीवर १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात झाली होती. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक वटवृक्षाप्रमाणे आपले १०० वर्ष साजरे करत आहे. वेदांपासून ते स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंत भारताच्या परंपरा आणि संस्कृती नव्या पिढींपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या १०० वर्षांपासून करत आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.