Wednesday, August 20, 2025 09:50:31 PM

भाजपचा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर डोळा; अखिलेश यादव यांचा मोठा दावा

अखिलेश यादव यांनी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक, 2024 वरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपचा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर डोळा अखिलेश यादव यांचा मोठा दावा
Akhilesh Yadav
Edited Image

Akhilesh Yadav On Waqf Board: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक, 2024 वरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बुधवारी लोकसभेत चर्चेदरम्यान त्यांनी भाजप सरकारवर हे विधेयक आणून आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, 'भाजपचा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर डोळा असून सरकारचा खरा हेतू वक्फ जमिनी ताब्यात घेण्याचा आहे. देशातील खऱ्या मुद्द्यांकडे लक्ष दिले जात नाही,' असा आरोपही त्यांनी केला आहे.    

अपयश लपविण्यासाठी विधेयक आणले - 

लोकसभेत बोलताना अखिलेश यादव म्हणाले, 'हे सरकार आपले अपयश लपवण्यासाठी नवीन विधेयके आणते. या सरकारने नोटाबंदी लागू केली, पण आजही देशभरात छाप्यांमध्ये जुन्या नोटा सापडत आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही सरकार अपयशी ठरले आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे, गंगा स्वच्छ करण्याचे आश्वासन अपूर्ण आहे, स्मार्ट सिटी योजना देखील अपयशी ठरली आहे. आता सरकारने वक्फ विधेयक आणून आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला आहे.'

हेही वाचा - 'आम्ही त्यांच्यासारख्या समित्या बनवत नाही...'; वक्फ विधेयकावरून अमित शहा यांची काँग्रेसवर टीका

भाजपने आपले हेतू स्पष्ट करावे - 

दरम्यान, अखिलेश यादव यांनी आरोप केला की भाजप सरकार धर्माच्या नावाखाली भेदभाव करत आहे. ते म्हणाले, 'यावेळी ईदनिमित्त अनेक ठिकाणी अनावश्यक निर्बंध लादण्यात आले. अशी परिस्थिती का उद्भवली हे सरकारने स्पष्ट करावे. भाजप जेव्हा जेव्हा नवीन विधेयक आणते तेव्हा ते आपला राजकीय अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न करते.'

हेही वाचा - Waqf Amendment Bill: संसदेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू; सभापतींनी विरोधकांना बोलण्यासाठी दिला 'इतका' वेळ

सरकार धर्माच्या नावाखाली व्यवसाय- 

महाकुंभाच्या आयोजनावरूनही अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप सरकारने महाकुंभाबद्दल मोठे दावे केले, पण तिथे लोकांचे प्राण गेले. महाकुंभात बेपत्ता झालेल्यांबद्दल सरकार सांगेल का? हे सरकार धर्माच्या नावाखाली व्यवसाय करत आहे. कुंभ हा एक व्यावसायिक कार्यक्रम म्हणून सादर केला जात आहे. परंतु, तो एक श्रद्धेचा विषय आहे.'

चीनच्या ताब्यातील जमिनीवर सरकार शांत - 

तथापि, अखिलेश यादव यांनी पुढे म्हटलं आहे की, वक्फ जमिनीपेक्षाही मोठा मुद्दा म्हणजे चीनने बळकावलेली जमीन. पण सरकार यावर गप्प आहे. रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील जमिनी विकल्या जात आहेत, पण वक्फ मालमत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा पूर्णपणे एकतर्फी निर्णय आहे. भाजपचे व्होट बँकेचे राजकारण आता सर्वांसमोर आहे. त्यांच्या मतांची टक्केवारी कमी झाल्यापासून ते मुस्लिम समुदायाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सरकार वक्फच्या जमिनी त्यांच्या जवळच्या लोकांना देऊ इच्छिते. यापूर्वीही अनेक विधेयके सादर करण्यात आली होती, पण त्यामुळे देशात काही मोठा बदल झाला का? भाजपचे उद्दिष्ट फक्त ध्रुवीकरण करणे आणि त्यांची व्होट बँकेला बळकटी देणे आहे, असा आरोपीही यावेळी अखिलेश यादव यांनी केला. 
 


सम्बन्धित सामग्री