Wednesday, August 20, 2025 09:51:02 AM

भारत-पाक तणावाचा IPL वर परिणाम; पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना धर्मशाला ऐवजी अहमदाबादला

भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL वर परिणाम; धर्मशाला विमानतळ बंद झाल्यामुळे 11 मेचा PBKS vs MI सामना अहमदाबादला हलवण्यात आला.

भारत-पाक तणावाचा ipl वर परिणाम पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना धर्मशाला ऐवजी अहमदाबादला

नवी दिल्ली: भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आता इंडियन प्रीमियर लीगवर (IPL) देखील परिणाम होताना दिसत आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा भारतीय लष्कर आणि हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्युत्तर देताना 9 दहशतवादी ठिकाणांवर मिसाइल हल्ले केले. या कारवाईनंतर देशातील अनेक हवाई अड्डे तात्पुरते बंद करण्यात आले आहेत, ज्यात धर्मशाला, श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, पठाणकोट, शिमला, चंदीगड आणि जामनगर यांचा समावेश आहे.

धर्मशाला विमानतळ बंद; IPL सामना शिफ्ट

या बंदीमुळे IPL संघांच्या प्रवासावरही परिणाम झाला आहे. विशेषतः 11 मे रोजी होणारा पंजाब किंग्स (PBKS) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामना मूळतः धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (HPCA) वर होणार होता. परंतु धर्मशाला विमानतळ तात्पुरता बंद झाल्यामुळे हा सामना आता अहमदाबादमध्ये होणार आहे.

गुजरात क्रिकेट संघटनेचे सचिव अनिल पटेल यांनी ही माहिती दिली असून, त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “बीसीसीआयने आमच्याकडे विनंती केली आणि आम्ही ती स्वीकारली आहे. मुंबई इंडियन्स संघ आज (8 मे) अहमदाबादला पोहोचणार आहे, तर पंजाब किंग्सचा प्रवास नंतर ठरवला जाईल.

हा सामना 11 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल.

हेही वाचा:शाहीन-3 विरुद्ध S-400; भारताची हवाई सुरक्षा सज्ज, दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर

धर्मशालामध्ये होईल पंजाब-दिल्लीचा सामना

दरम्यान, 8 मे रोजी होणारा पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामना मात्र धर्मशालामध्येच नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी खेळाडू आणि आयोजकांनी सर्व तयारी केली आहे.

भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि दहशतवादी घटनांवर भारताने दिलेले कडक प्रत्युत्तर यामुळे देशातील सुरक्षेच्या दृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर IPL सारख्या मोठ्या स्पर्धेतील सामन्यांची स्थळे बदलणे ही काळाची गरज झाली आहे. खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत बीसीसीआयने योग्य पाऊल उचलले आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या सामन्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री