Sunday, August 31, 2025 04:34:45 PM

ग्रे मार्केट म्हणजे काय? IPO पूर्वी तुम्ही कंपनीचे शेअर्स कसे खरेदी करू शकता? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

तुम्ही वारंवार ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) किंवा फक्त ग्रे मार्केट असा शब्द ऐकला असेल. पण नेमकं हे ग्रे मार्केट म्हणजे काय? IPO उघडण्याआधीच शेअर्सचा व्यवहार कसा होतो? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

ग्रे मार्केट म्हणजे काय ipo पूर्वी तुम्ही कंपनीचे शेअर्स कसे खरेदी करू शकता जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
Edited Image

मुंबई: जेव्हा एखाद्या कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) येतो, तेव्हा बाजारात त्या कंपनीच्या नावाची मोठी चर्चा सुरु होते. त्याचवेळी तुम्ही वारंवार ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) किंवा फक्त ग्रे मार्केट असा शब्द ऐकला असेल. पण नेमकं हे ग्रे मार्केट म्हणजे काय? IPO उघडण्याआधीच शेअर्सचा व्यवहार कसा होतो? आणि त्यामध्ये गुंतवणूक करण्याचे धोके आणि फायदे काय असतात? चला, याचा सविस्तर आढावा घेऊयात.

ग्रे मार्केट म्हणजे काय?

ग्रे मार्केट म्हणजे अनौपचारिक आणि अनियंत्रित बाजार. यामध्ये एखाद्या कंपनीचे शेअर्स त्यांच्या अधिकृत लिस्टिंगपूर्वी (आयपीओपूर्वी) विकले किंवा खरेदी केले जातात. हे व्यवहार कोणत्याही अधिकृत एक्सचेंज (जसे NSE किंवा BSE) वर होत नाहीत. म्हणूनच या बाजाराला अनलिस्टेड मार्केट असेही म्हणतात. ग्रे मार्केटमध्ये व्यवहार करणारे ब्रोकर आणि गुंतवणूकदार हे आयपीओच्या यशाबाबतचा अंदाज लावून शेअर्सची खरेदी-विक्री करतात. या बाजारात SEBI चा कोणताही थेट हस्तक्षेप नसतो, त्यामुळे यामधील जोखीम खूप अधिक असते.

हेही वाचा - Trump Strikes Again: ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने कोसळले आशियाई बाजार; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण

ग्रे मार्केटमध्ये शेअर्स कसे खरेदी केले जातात?

ग्रे मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे ब्रोकर्समार्फत अनलिस्टेड शेअर्सचा व्यवहार आणि दुसरा मार्ग म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्यांद्वारे किंवा प्रवर्तकांद्वारे, ज्यांना आयपीओ उघडण्यापूर्वी शेअर्स विकायचे आहेत. काही अनुभवी आणि विश्वासार्ह ब्रोकर्सकडे अशा शेअर्सचा व्यवहार उपलब्ध असतो. ते IPO उघडण्याच्या आधी संबंधित कंपनीचे शेअर्स विक्रीस ठेवतात. तथापी, काही वेळा कंपनीचे कर्मचारी किंवा मूळ प्रवर्तक IPOपूर्वी त्यांच्याकडे असलेले शेअर्स विकू इच्छितात. हे शेअर्स खाजगी व्यवहारामार्फत खरेदी करता येतात. कोणताही व्यवहार करताना, विक्रेता आणि व्यवहाराची पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे.

हेही वाचा - यूट्यूब, इंस्टाग्रामवरून पैसे कमावताय? मग ‘या’ पद्धतीने भरा कर; सरकारने बदलले नियम

ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची किंमत कशी ठरते?

या बाजारात शेअर्सची किंमत मागणी, पुरवठा, कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड आणि भविष्यातील IPO यशाचा अंदाज यावर आधारित असते. ही किंमत ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) म्हणून ओळखली जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या IPO ची इश्यू किंमत 100 असेल आणि GMP 50 रुपये असेल, तर लोक त्या शेअर्ससाठी 150 रुपये देण्यास तयार आहेत, असा अर्थ होतो. परंतु,  IPO नंतर शेअरचे मूल्य GMP पेक्षा खूप कमी किंवा जास्त असू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अनलिस्टेड शेअर्समध्ये गुंतवणूक करताना जोखीम लक्षात घेणे आवश्यक आहे. 

Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!
 


सम्बन्धित सामग्री