Wednesday, August 20, 2025 09:25:20 AM

दुधाचा चहा पिणे चांगले की वाईट? महिनाभर नाही घेतला तर काय होईल?

झोप किंवा थकवा कमी करण्यासाठी दिवसभरात अनेक वेळा चहाचे सेवन केले जाते. तर, एक महिना दुधाचा चहा पिणे सोडल्यास तुम्हाला फायदा होईल की नुकसान होईल, ते जाणून घेऊ..

दुधाचा चहा पिणे चांगले की वाईट महिनाभर नाही घेतला तर काय होईल

Milk Tea Side Effect : सकाळ आणि संध्याकाळची सुरुवात अन् चहा नाही असं कधी होईल का? अनेकजण तर गाडीत पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी सुरू होत नाही, असंही म्हणतात.. तात्पर्य काय.. चहाशिवाय पानही हलत नाही.. अनेकजण तर, दिवसातून चार-पाच वेळा चहा घेतात.

दुधाचा चहा म्हणजे भारतीयांचे पहिले प्रेम. आपल्यातील अनेकांच्या सकाळची सुरुवात एका कप गरम दुधाच्या चहाने होते आणि नाही, नाही म्हणता झोप किंवा थकवा कमी करण्यासाठी दिवसभरात अनेक वेळा चहाचे सेवन केले जाते. पण, दुधाच्या चहाने आरोग्यावर चांगले परिणाम होतात की, वाईट परिणाम होऊ शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

दुधाच्या चहातले घटक कोणते? तर, चहापत्ती, पाणी, साखर, दूध आणि ज्यांना आवडत असेल आलं, वेलची वगैरे.. पण एक महिना दुधाचा चहा न प्यायल्यास तुमच्या शरीरात कोणते बदल दिसून येतात याबद्दल जाणून घेऊ.

हेही वाचा - Home Decoration Tips : घराचं डेकोरेशन तर करायचंय.. पण जास्त खर्च परवडणार नाही? अशी करा आपल्या बजेटमधली सजावट

आपल्यातील अनेकांची दिवसाची सुरुवात एक कप गरम दुधाच्या चहाने होते. नाही, नाही म्हणता झोप किंवा थकवा कमी करण्यासाठी दिवसभरात अनेक वेळा चहाचे सेवन केले जाते. पण या दुधाच्या चहामध्ये कॅफिन, साखर व टॅनिनचे प्रमाण जास्त असते. याच्या अतिसेवनाने तुमच्या आरोग्याचे खूप मोठे नुकसान होऊ शकते…

1. कॅफिन – कॅफिन शरीराला उत्तेजित (बूस्ट) करते. याच्यामुळे रात्री किंवा झोपण्याच्या वेळात चहा प्यायल्यास झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्याचबरोबर तुमची चिंता किंवा ताण-तणावाची भावना आणि हृदय गतीदेखील वाढवू शकते.
2. साखर – अनेकांना भरपूर साखर घालून चहा पिण्याची सवय असते. अतिरिक्त साखरेमुळे लठ्ठपणा, मधुमेह व दातांच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
3. टॅनिन – टॅनिन शरीरातील पोषक घटकांच्या शोषणात अडथळा आणतो, ज्यामुळे शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊ शकते.

महिनाभर दुधाचा चहा प्यायला नाही तर काय होईल?
1. वजन कमी करणे शक्य – दूध आणि साखर घालून केलेल्या चहामध्ये असलेले कॅलरीज जास्त असतात. साखर हा तर वजन वाढण्यास प्रामुख्याने कारणीभूत असलेला घटक आहे. दुधाच्या चहाचे सेवन कमी केल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होऊन, तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. ज्यांना लठ्ठपणा कमी करायचा आहे, त्यांना याचा नक्कीच उपयोग होतो.
2. पचन सुधारण्यास मदत – दुधाच्या चहामध्ये असलेले कॅफिन आणि टॅनिनमुळे पचन मंदावते आणि ॲसिडिटीच्या समस्या वाढतात. दुधाचा चहा कमी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि ॲसिडिटीची समस्या कमी होते. 

3. झोप चांगली येईल – कॅफिनमुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो. दुधाचा चहा कमी केल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारेल आणि तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल.
4. त्वचा होईल चमकदार – जास्त चहा पिण्यामुळे त्वचा खराब होते. दुधाच्या चहामध्ये असलेल्या साखरेमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि त्वचेवर मुरुमे येऊ शकतात. दुधाच्या चहाचे सेवन कमी केल्याने त्वचा निरोगी, चमकदार दिसेल.
5. दिवसभराचा उत्साह – दुधाचा चहा प्यायल्याने सुरुवातीला ऊर्जेचे प्रमाण वाढते; पण नंतर थकवा जाणवतो. दुधाचा चहा कमी प्यायल्याने सुरुवातील थोड जड जाऊ शकते. मात्र, एकदा सवय झाल्यानंतर तुम्हाला दिवसभर उत्साही वाटण्यास मदत होईल.
6. हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत – दुधाचा चहादेखील हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो. त्यामुळे दुधाचा चहा न प्यायल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळू शकते.

हेही वाचा - Chanakya Niti: आचार्य चाणक्यांचा विद्यार्थ्यांसाठी गुरुमंत्र; यश हवंय ना? मग या 4 गोष्टी नक्की करा

कशी सोडावी दुधाचा चहा पिण्याची सवय ?
आपल्यातील अनेकांना चहा पिण्याची इतकी सवय असते की, ती सोडणे खूप कठीण जाते. जणू काही चहाचे व्यसनच जडते आणि कुठलेही व्यसन कालांतराने वाईट परिणाम दाखवू लागते. मग अशा वेळी चहा पिण्याची सवय हळूहळू कमी करावी. दुधाचा चहा एकाच वेळी पूर्णपणे बंद करण्याऐवजी एक एक वेळ कमी करत न्यावा. जर तुम्हाला चहा सोडायचा असेल तर, या पद्धतीचा अवलंब करून बघा.
तुम्ही कमी साखर किंवा साखरेशिवाय दुधाचा चहा बनवू शकता किंवा बिनसाखरेचा कोरा चहा पिऊ शकता.

जेव्हा तुम्हाला दुधाचा चहा प्यावासा वाटतो तेव्हा स्वतःला दुसऱ्या कामात व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करा. दुसरे एखादे तुम्हाला आवडणारे काम करण्यात स्वतःला बिझी ठेवल्याने चहाची सवय सुटण्यास मदत होऊ शकते.

कधीही अर्धपोटी राहू नये. तसेच, भुकेच्या वेळी कधीही चहा पिऊ नये. जेवणाच्या वेळी पोटभर जेवावे आणि त्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नये. गरज असल्यास थोडे-थोडे पाणी पित रहावे. मेंदूला शरीराकडून पोट भरल्याचा संदेश गेल्यानंतर बराच वेळ काही खाण्या-पिण्याची इच्छा होत नाही.

दुधाच्या चहाऐवजी तुम्ही हर्बल टी, ग्रीन टी किंवा फळांचा रस पिऊ शकता. मात्र, कोणताही चहा जास्त प्रमाणात पिणे चांगले नाही. तसेच, फळांचा ताजा रस प्यावा किंवा रस न बनवता थेट फळेच खाणे चांगले.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री