Wednesday, August 20, 2025 12:00:22 PM

उन्हाळी सुट्टीत ट्रिप प्लॅन करताय? 'या' टिप्स प्रवासात आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाच्या

कडक उन्हात फिरताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे ठरते. तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल, तर सहलीला जाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा. हवामानानुसार तुमची बॅग पॅक करा.

उन्हाळी सुट्टीत ट्रिप प्लॅन करताय या टिप्स प्रवासात आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाच्या

Summer Vacations Tips : उन्हाळ्यात मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये मस्त सहल आयोजित करण्याचा विचार करत असाल तर, या टिप्स खास तुमच्यासाठी आहेत. कारण, या हंगामात प्रवास करणे हे स्वतःच एक मोठे आव्हान असते. यावेळी, कडक उन्हात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे ठरते. जर तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल, तर सहलीला जाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा आणि जिथे फिरायला जात आहात, तेथील हवामानानुसार तुमची बॅग पॅक करा. जेणेकरून, तुम्ही प्रवासादरम्यान आणि घरी परतल्यावरही निरोगी आणि आनंदी राहाल.

पिण्याचे पाणी आणि लिंबू पाणी करेल मदत
प्रवास करताना बांबू किंवा मातीची पाण्याची बाटली सोबत ठेवा. त्यात पाणी भरून घ्या आणि ते थोडे-थोडे पित रहा. प्लास्टिकच्या बाटल्या टाळा. प्रवास करताना तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके तुमचे शरीर हायड्रेटेड राहील. यासोबतच, जर तुम्हाला नारळ पाणी मिळाले तर तेही प्या. लिंबू सोबत ठेवा. एक लिंबू एक लिटर पाण्यात मिसळून दिवसभर ते पाणी थोड्या-थोड्या वेळाने प्या. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहील आणि कडक उन्हाचा त्रास कमी होईल. लिंबू पाणी आणि साध्या पाण्याची बाटली वेगवेगळी सोबत ठेवा.

असे कपडे वापरा
उन्हाळ्यात खूप उकडते. या सुट्टीत बरेच लोक असे कपडे घालतात, जे लहान असतात आणि बरीचशी त्वचा उघडी राहते. चुकूनही असं करू नका. प्रवासादरम्यान नेहमी हात आणि पाय झाकले जातील, असे सुती कपडे घाला, ज्यामध्ये घाम सहज सुकू शकेल. यामुळे टॅनिंग होणार नाही. नेहमी हलक्या रंगाचे कपडे घाला. फिरण्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दुपारी विश्रांती घ्या किंवा इनडोअर फिरण्याची ठिकाणे असतील, तिथे फिरा. (उदा., म्युझिअम) सकाळी-संध्याकाळी बाहेर फिरायला जाण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा - पगार लगेच संपतो आणि महिनाअखेरीस वांदे होतात? हा खास फॉर्म्यूला करून देईल बचत

उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करणारा काळा चष्मा आणि टोपी
उन्हाळ्याच्या सुट्टीत उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करणारा काळा चष्मा आणि डोक्याला टोपी नक्की घाला. यामुळे सूर्याचे कडक ऊन तुमच्या डोक्यावर पडणार नाही आणि तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे, डोळ्यांवर चष्मा लावल्याने डोळे लाल होणार नाहीत आणि जळजळही होणार नाही. खरंतर, तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. हे विशेषतः डोंगराळ भागात जास्त घडते.

त्वचेवर सनस्क्रीन लावा
सनस्क्रीन लावणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे त्वचेचे सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण होईल आणि टॅनिंगही होणार नाही. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीन असावे याची विशेष काळजी घ्या. कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी लोशन किंवा क्रीम आधारित सनस्क्रीन लावावे. तेलकट त्वचेवर जेल बेस्ड सनस्क्रीन लावावे आणि संवेदनशील त्वचेवर फिजिकल सनस्क्रीन लावावे. एसपीएफ 30 भारतीय त्वचेला योग्य ठरते.

प्रवासादरम्यान व्यायाम
अनेकदा लोक प्रवास करताना व्यायाम करत नाहीत. तर दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. सुट्टीत तुम्ही मजा करू शकता. पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही हॉटेलमध्ये किंवा मोकळ्या जागी व्यायाम करू शकता. जर, तुमचे बजेट थोडे ठेवता आले तर, जिम किंवा स्विमिंग पूल असलेले हॉटेल बुक करा. तुम्ही सकाळी तिथे व्यायाम करू शकता. जर हे शक्य नसेल तर फिरायला जा. डोंगरात आणि समुद्रकिनाऱ्यावर चालण्यात एक वेगळाच आनंद असतो.

पुरेशी झोप घ्या
झोप ही प्रत्येक आजारावरचा इलाज आहे. जर तुम्ही पूर्ण झोप घेतली तर शरीरात ऊर्जा टिकून राहते. शरीर आरामशीर राहिल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. सुट्टीत रात्री उशिरा पार्टी करण्याऐवजी झोपेवर लक्ष केंद्रित करा. दररोज 7 ते 8 तासांची झोप घ्या जेणेकरून प्रवासाची मजा द्विगुणित होईल आणि शरीर चपळ राहील.

संतुलित आहार
प्रवास करताना तुमच्या आहाराची खूप काळजी घ्या. सकाळी नाश्ता नक्की करा. अन्न संतुलित असले पाहिजे. म्हणजेच, त्यात प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असावीत. स्थानिक ताजे अन्न खाण्याचा प्रयत्न करा. तेलकट, चरबट पदार्थ टाळा.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
जर तुम्ही स्वतःचे चारचाकी वाहन सोबत घेणार असाल, तर तुम्ही घरातून निघतानाच पिण्याच्या पाण्यासाठी 20 ते 25 लिटरचा कॅन भरून सोबत ठेवू शकता. अनेकदा प्रवासाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, कोल्डड्रिंक यांचे दर एमआरपीपेक्षा जास्त लावलेले असतात. यामुळे प्रवास खर्च विनाकारण वाढतो. स्वतःचे वाहन सोबत घेणार असाल तर, छोटी दुरुस्ती, पंक्चर काढण्यासाठीच्या वस्तू सोबत ठेवा.

हेही वाचा - सर्पदंशावर मंत्रतंत्र खरंच उपयोगी पडतात? या उपायाने जीव वाचतो? सत्य जाणून आश्चर्य वाटेल

औषधे, कात्री, पेन, फर्स्ट एड किट
नेहमी लागणारी औषधे, उन्हाळ्याचा त्रास झाल्यास प्रथमोपचारासाठी लागणारी औषधे, लेमन गोळ्या, खडीसाखर सोबत ठेवा. कात्री, पेन, कागद, फर्स्ट एड किट यांची यादी तयार करून त्यानुसार या वस्तू सोबत घ्या.

स्वतः जेवण बनवणार असाल तर..
फिरायला गेलेल्या ठिकाणी गंमत म्हणून एखाद्या वेळी स्वतः जेवण बनवणार असाल तर, त्यासाठी आवश्यक वस्तू सोबत ठेवा. तुम्ही काय मेनू बनवणार आहात ते आधीच ठरवा. त्यानुसार साहित्य सोबत घ्या. काही वेळा शिजवण्याची गरज पडणार नाही, असा पदार्थही तुम्ही बनवू शकता. (जसे की, सॅलड, भेळ, सँडविच आदी.) यासाठी प्रि-प्लॅनिंग करा.


सम्बन्धित सामग्री