मुंबई: मुंबईमध्ये दररोज लोकल ट्रेनसंदर्भातील अपघाताच्या बातम्या समोर येत आहे. आता मुंब्रा आणि कळवा दरम्यान मुंबई लोकल ट्रेनमधून पडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृताचे नाव मोहम्मद अयान जब्बार अली शेख असे आहे, तो महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील रहिवासी आहे. ही घटना 27 जून रोजी सकाळी मुंब्रा आणि कळवा दरम्यानच्या नवीन रेल्वे पुलाजवळ घडली.
हेही वाचा - हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी जनतेचा विजय; राज ठाकरे यांची परखड प्रतिक्रिया
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 11 वाजता शेख मुंब्रा रेल्वे स्थानकावरून लोकल ट्रेनमध्ये चढला होता. तो मुंबईतील त्याच्या कामाच्या ठिकाणी जात होता. त्यावेळी तो गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून पडला. एफपीजेच्या वृत्तानुसार, तो दुसऱ्या बाजूला असलेल्या रुळांवर पडला. इतर प्रवाशांकडून माहिती मिळताच जीआरपीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तरुणाला ताबडतोब ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा - हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानं मविआत आनंद; विधानभवन परिसरात टाळ वाजवून व्यक्त केला आंनद
दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याचा मोबाईल फोन आणि ओळखपत्रे जप्त केली असून त्याच्या कुटुंबाला ताबडतोब कळवण्यात आले. तसेच शुक्रवारी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आणि 28 जून रोजी मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला. जून 2025 मध्ये डोंबिवली-कळवा विभागात ट्रेनमधून पडून प्रवासी मृत्युमुखी पडल्याची ही चौथी घटना आहे.