पिंपरी चिंचवड: राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या पाच जणांना मंगळवारी बावधन पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याच पाच जणांना आज पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना फरार होण्यामध्ये मदत करणाऱ्या तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या पाच आरोपींना अखेर पुणे न्यायालयाने जामीन दिला आहे. वैष्णवी हगवणेचा मानसिक आणि शारिरीक छळ करणारे सगळे गजाआड आहेत. तसेच मंगळवारी वैष्णवीच्या गुन्हेगारांना साथ देणाऱ्यांना सुद्धा गजाआड करण्यात आले होते. मात्र आज त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
हेही वाचा : देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा अपघात; कारमधील 8 जण गंभीर जखमी
फरार व्हायला मदत करणे किंवा आश्रय देण्याची शिक्षा ही सात वर्षापेक्षा कमी असल्याने आरोपींना लगेच पुणे न्यायालयातून जामीन मिळाला आहे. मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे, बंडू लक्ष्मण पाठक, अमोल विजय जाधव, राहुल दशरथ जाधव आणि प्रीतम वीरकुमार पाटील या पाच आरोपींना पुणे न्यायालयाने जामीन दिला आहे.
सुशील हगवणे व राजेंद्र हगवणेंनी कसा केला प्रवास?
17 तारखेला आलिशान इंडीवर गाडीतून राजेंद्र हगवणे हॉस्पिटलला गेले. त्यानंतर थार या गाडीतून मुहूर्त लॉन्स येथे गेले. नंतर याच गाडीतून वडगाव मावळकडे प्रवास केला. पुढे पवना डॅमकडे रवाना झाले व तेथेच फार्म हाऊसवर मुक्काम केला. त्यानंतर थार गाडीतून आळंदी येथे गेले व एका लॉजवर मुक्काम केला. त्यानंतर 18 तारखेला पुढे याच धार गाडीतून वडगाव मावळ येथे गेले. वडगाव मावळ येथे बंडू फाटक यांच्याकडे बलेनो गाडीने गेले. 19 तारखेला पुसेगावकडे हे दोघेही जण रवाना झाले. पुसेगाव येथील अमोल जाधव यांच्या शेतावर हे दोघेही गेले. नंतर पसरणी मार्गे कोगनोळी येथे 19 व 20 तारखेला हॉटेल हेरिटेज येथे मुक्काम केला. त्यानंतर पुढे 21 व 22 तारखेला प्रीतम पाटील मित्राच्या शेतावर मुक्काम केला. पुढे 22 ला रात्री पुण्याकडे रवाना झाले व पुण्यातील मुहूर्त लॉन्स या ठिकाणाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.