स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल
नाशिक: नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदवड तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार उघड झाला आहे. ग्रामसेवकाच्या आशीर्वादाने झेरॉक्स सरपंचाने धुमाकूळ घातला असून आपल्या मनमानी कारभारामुळे तो कोणालाही जुमानत नाही. विशेष म्हणजे, अधिकृत सरपंच कार्यालयात कधीच हजर राहत नाहीत, तर त्यांचा मुलगाच सरपंच म्हणून मिरवतो. याबाबत स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे चांदवड तालुकाध्यक्ष सागर राजेंद्र बोरगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
झेरॉक्स सरपंचाची बेकायदेशीर दहशत
दहेगाव (म.) ग्रामपंचायतीच्या अधिकृत सरपंच सौ. कमलाबाई बाळू पगारे या कार्यालयात हजर राहत नाहीत. मात्र, त्यांचा मुलगा गजानन बाळू पगारे हा सरपंचाच्या खुर्चीवर बसून गावगाडा चालवत आहे. तो गावकऱ्यांशी सरपंचाच्या नात्याने संवाद साधतो आणि निर्णय घेतो. शासनाने नुकतीच अशा झेरॉक्स सरपंचांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, तरीही दहेगावमध्ये हा प्रकार सुरुच आहे.
ग्रामसेवक राहुल सुभाष ततार आणि झेरॉक्स सरपंच गजानन पगारे यांच्या संगनमताने ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने चालवला जात आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला जात आहे. गावात होणारी बहुतांश कामे बनावट आहेत आणि यावर आक्षेप घेतल्यास ग्रामसेवक आणि झेरॉक्स सरपंच उडवाउडवीची उत्तरे देतात.
अधिकाऱ्यांना हाताशी धरून मनमानी निर्णय
ग्रामसेवक आणि तहसीलदार देखील या झेरॉक्स सरपंचाला पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक अर्ज आणि तक्रारी ग्रामसेवकाकडे दिल्यास झेरॉक्स सरपंच स्वतःच उत्तर देतो. यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.
भ्रष्टाचाराचे पुरावे आणि तक्रार
सागर बोरगे यांनी या संपूर्ण गैरव्यवहारासंदर्भात फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत झेरॉक्स सरपंचाने मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर त्वरित चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
लाखोंचा भ्रष्टाचार बाहेर येणार?
गजानन पगारे हा थेट सरपंचाच्या खुर्चीवर बसतो आणि तहसीलदार, ग्रामसेवक आणि बीडीओ यांना पैसे देऊन आपल्या बाजूने निर्णय करून घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या विरोधात कोणी बोलले, तर त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देतो, त्यामुळे अनेक ग्रामस्थ दहशतीत आहेत.
स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचा इशारा
या संपूर्ण प्रकाराची तात्काळ चौकशी न केल्यास स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सागर बोरगे यांनी दिला आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.